गुरुवार, २ सप्टेंबर, २०१०

स्वदेशी.

            भारतात बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तुंमधे स्वदेशी कारखानदारांनी निर्मीलेली व परदेशी कारखानदारांनी / कंपन्यांनी निर्मीलेली अशी सरळ सरळ विभागणी करता येईल. बहुतेक ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु या परदेशी कंपन्यांनी निर्मीलेल्या आढळतात त्यात सोनी, नोकिया, सॅमसंग या परदेशी कंपन्यांनी भारतीय बाजारात चांगलेच बस्तान मांडले आहे. कुठल्या प्रकारची ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला एका विशिष्ठ कंपनीचे नाव समोर येते. उदाहरणार्थ मोबाईल फोन म्हटला कि नोकियाची आठवण आल्या शिवाय मोबाईलचा विचार करणे अशक्य आहे. तर दूरदर्शन संच घ्यायचा असल्यास सोनीचा संच आठवणारच.
          या परदेशी कंपन्यांची एक कौतुक करण्यासाराखी गोष्ट म्हणजे ते आपल्या ग्राहकांप्रती कमालिचे जागृत असतात. का नसणार त्यांना आपले दुकान वर्षानुवर्षे चालवायचे आहे ना ! तर हे दुकान चालत रहावे म्हणुन ते कायम नवनविन कल्पना आपल्या उत्पादनात जोडत जातात व आपले उत्पादन कायम ग्राहकांना मोहवत ठेवेल याची काळजी घेतात. ग्राहकाला पण वाटते आपले जुने मॉडेल जुने झाले व नविन घ्यायला हवे.  या कंपन्यांचा ग्राहकच हे दुकान कायम चालत राहिल याची काळजी घेतो.  एका ग्राहकाच्या चुकीमुळे मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यावर म्हणुनच नोकियाने आपल्या सर्व तत्सम बॅटर्‍या बदलून देण्याची तयारी दाखवली. हे सर्व करताना पानपान भराच्या जाहिराती दिल्याचे आपल्याला आठवतच असेल. त्यांनी त्यांच्या जाहिरातीत आपले ग्राहक तुटणार नाहीत याची व्यवस्थीत काळजी घेतली. चुक ग्राहकाची आहे हे माहित असुनही त्यांनी आपले नाव खराब होवू नये व ग्राहक टिकावा याची संपूर्ण दक्षता घेतलीच.
          या विरुद्ध परिस्थीती आपल्या भारतीय उत्पादनांची आहे हे सांगताना खेद होतो. ग्राहक हा या स्वदेशी कंपन्याचे उत्पादन विकत घेण्या पर्यंत राजा असतो, त्यानंतर मात्र त्याला एखाद्या भिकार्‍या सारखे या कंपन्यांना फोन किंवा इतर मार्गाने भिक मागावी लागते. या कंपन्यांना आपल्या उत्पादनातल्या तृटी दुरुस्त करुन देण्यात व ग्राहक टिकावा असे वाटतच नाही. उदाहरणार्थ: आपण Videocon या कंपनीचे कोणतेही उत्पादन विकत घेवून बघा, ते चांगले चालले तर आपले नशिब अन्यथा आपल्याला यांव्या दारात भिक मागत फिरावे लागेल.
          स्वदेशी जागरण मंचाच्या प्रेरणेने आपले बरेच ग्राहक स्वदेशी उत्पादन विकत घ्यायला लागले. या मागच अर्थशास्त्र पटल्यामुळेच त्यांनी भारतीय उत्पादनेच विकत घ्यायची असे ठरवले. खरतर जागरण मंचामुळे आपल्या कंपन्यांना एक चांगली संधी चालुन आली होती पण संधीचे सोने करण्या ऎवजी ग्राहकाच्या माथी निकृष्ट उत्पादने मारण्याचा व पैसे कमावण्याचाच व्यवसाय या कंपन्यांनी सुरु केल्याचे आढळेल.  या व्यवसाय पद्धतीमुळे बर्‍याच चांगल्या भारतीय उत्पादनांकडे ग्राहक पाठ फिरवू शकतो याची या कंपन्यांना जाणीव असल्याचे दिसत नाही.
           अशा या निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांच्या बाजारात काही चांगली उत्पादनेही आहेत व यांचा ग्राहक दिवसेंदिवस वाढत आहे हेही दखल घेण्यासारखे आहे. यात प्रामुख्याने विको वज्रदंती तसेच पितांबरी सारखी चांगली उत्पादने आहेत.  भारतातल्या मोठ्या कंपन्या जागतीक दर्जाची कामगीरी करित असतांना सामान्य ग्राहकाकडे भारतीय कंपन्या दुर्लक्ष करताहेत यात त्यांचेच नुकसान अधिक संभवते.

२ टिप्पण्या:

  1. याचे कारण दुय्यम दर्जाचा माल बाजारात येऊ नये या उद्देशाने केलेला ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक फक्त नुकसानभरपाई मिळविण्याकरता वापरतात.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद शरयु, माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रीया दिल्या बद्दल.
    ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांसाठीच आहे. नावातच संरक्षण आहे. आणि ग्राहकांनी तो नुकसान भरपाई मागण्या साठी वापरावाच.
    मला म्हणायचे होते कि जर परदेशी कंपन्या आपल्या ग्राहकांची काळजी घेतात तर स्वदेशी कंपन्या असे का करित नाहित ?

    उत्तर द्याहटवा