बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - २

महाविद्यालयीन प्रवेशाची समस्या सोडवण्यासाठी मुख्यत: काही बाबींचा विचार केल्यावर खालील समस्या प्रकर्शाने जाणवल्या.
१. प्रवेश अर्ज विकत घेणे.
२. अर्ज भरल्यावर तो संबंधित महाविद्यालयात जमा करणे.
३. अर्ज जमा केल्यावर महाविद्यालयात जाऊन गुणवत्ता यादी बघणे.
४. आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळे पर्यंत प्रवेश घेणे व रद्द करणे यात बराच पैसा वाया जातो.
     वरिल चारही बाबतीत विद्यार्थ्याला व सोबत पालकांना बराच वेळ रांगेत उभे रहावे लागते जे सर्वांनाच गैरसोयीचे आहे. कारण यात बराच वेळ उगाचच वाया जातो व एखाद्या विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त महाविद्यालयात अर्ज करायचा असेल तर त्याला तितक्याच जास्त महाविद्यालयात रांगेत उभे रहावे लागते.
     प्रत्येक अर्जासोबत सत्य प्रतिलीपी जोडावी लागते ज्यामुळे त्याला झेरॉक्सचा नाहक भुर्दंड पडतो.
    प्रवेश मिळेपर्यंत विद्यार्थ्याचा जीव टांगणी वर असतो ज्यामुळे त्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
   या संगणकाच्या युगात शासनाने आठव्या वर्गापासुन जर शाळानिहाय विद्यार्थ्यांची माहिती गोळा करुन ठेवली व महाविद्यालयीन प्रवेशा वेळी संबंधित महाविद्यालयांना ती माहिती पुरवण्यात आली तर कोणताही अर्ज न भरता सर्व महाविद्यालयांना प्रवेश देणे सोयीचे होईल. या पद्धतीत कागदाचा होणारा वापरही कमी होईल व ते पर्यावरणाच्या पण हिताचे असेल.
(शासन कशाप्रकारे ही माहिती गोळा करु शकते व त्याचा वापर कसा करता येईल हे पुढील लेखात.)

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - १

मार्च महिन्यात दहावीची परिक्षा संपल्यावर विद्यार्थी निकाल व त्यानंतर हवा तिथे प्रवेश मिळेल कि नाही या मानसिक दडपणाखाली असतात. जवळपास सहा महिने रिकामे राहून मानसिक दडपणाखाली रहाण्याच हे वय नाही. यावर उपाय काढायला शासन स्तरावर तसेच शैक्षणीक क्षेत्रातील अनुभवी जाणकार प्रयत्नात असावेत त्यामुळेच यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बरिच सुरळीत पार पडली. तरिही या प्रक्रियेला लागणारा अकून कालावधी बघता यावर यापेक्षा चांगला तोडगा निघायला हवा असे वाटते.
अभियांत्रिकी प्रवेश ज्याप्रकारे केंद्रिभूत पद्धतीने केले जातात तसे अकरावी साठी अवलंबण्यात आले आहेत. पण अजुनही ते बरेच वेळखाऊ वाटतात तसेच त्यानंतर बारावी नंतर परत याच पद्धतीचा वापर करुन अभियांत्रीकी प्रवेश देण्यात येतात. या दोन्ही पद्धतींचा एकूण विचार केल्यावर असे वाटते कि ही पद्धत अधिक सुकर करण्यात यावी.
मागील ५ - ६ वर्षे या पद्धतीचा अभ्यास केल्यावर असे वाटते कि यात बरीच सुधारण करणे शक्य आहे. ही नविन पद्धत तयार करताना एक विचार असा आला कि विद्यार्थी जेथे रहातो त्या ठिकाणा जवळच्याच शाळा - महाविद्यालयात त्याला प्रवेश देण्यात आला तर वाहतुकीची समस्या पण काही अंशी सुटेल. कोणत्याही विद्यार्थ्याला गच्च भरलेल्या लोकल किंवा बसने प्रवास करावा लागू नये ह्याचा विचार पण करण्यात आला.
या समस्येवर सुचलेला उपाय दर आठवड्याला एक भाग या तर्‍हेने पोस्ट करण्यात येईल. सर्वांना विनंती करतो कि आपल्या सुचना अवश्य कळवाव्यात.

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

दिवाळी.

सर्वप्रथम या माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना ही दिवाळी अत्यंत आनंदाची जावो हि शुभेच्छा.
काल मुलीची परिक्षा संपली. शाळेतुन तीला घरी आणताना मी नेहमी थोडा तयारीतच होतो, आज परिक्षा संपली चला आता मला फटाके घेऊन द्या अशी मागणी आल्यास तीला नाराज न करता सरळ तिच्या सोबतच दुकाना गाठायचे व म्हणेल त्यातले आवाज कमी करणारे फटाके घेवून द्यायचे हा सरळ हिशोब मी केला होता. पण तिने घरी आणे पर्यंत काही म्हटले नाही. त्यामुळे कपडे बदलून मी छान झोप काढली. उठल्यावर संकट आले तर माझी तयारी होतीच ! उठल्यावर बराच वेळ TV पहात आमच्या गप्पा झाल्या. बाहेर इतर मुलांचे फटाके उडवणे सुरु झाले, मी वाटच बघत होतो. बराच वेळ झाल्यावर मी मुलीला विचारले तुझी तब्येत बरी आहे ना ? ती हो म्हणाली ! परत थोड्या वेळाने मी दोन तीनदा हाच प्रश्न विचारला. तिनेही शांतपणे माझ्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. तिला कळेना बाबांना काय झाले, त्यामुळे रात्री जेवताना तिने डाव साधला व मलाच उलट प्रश्न केला, "बाबा तुमची तब्येत बरी आहेना ?" म्हटले का ? तर म्हणे तुम्ही शाळेतन आल्यापासुन मला हाच प्रश्न विचारत आहात ना ! आता मी विचारला तर काय झाले ?
आज सकाळी मीच तिला म्हटले चल आपण थोडे फटाके आणुया. आणि तिचे उत्तर ऎकून  मला आश्चर्याचा धकाच बसला, "नाही आणायचे" मी म्हटले का ? माझ्यावर काही राग आहे का ? तर म्हणे यावर्षीपासुन फटाके नाही उडवायचे कारण त्यामुळे आवाजाचे व हवेचे प्रदुषण होते, त्यामुळे फटाके बंद.
खरच, नविन पिढीला फक्त नावेच ठवणार्‍या माझ्या सारख्याला धक्का नाहीतर काय बसणार ? धक्क्यातुन सावरल्यावर मात्र जाणीव झाली, माझी मुलगी आता मोठी झाली आहे व समंजस पण ! आजपर्यंत मी शिकवत होतो आता मात्र मला शिकवायला माझीच मुलगी तयार झाली आहे. त्यामुळे आमची ही दिवाळी फटाक्यांशिवाय होणार !