सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

हरवलेले लोक.

                                            दिवाळी अगोदर एक दिवस मुलीने बातमी दिली, तीच्या मैत्रिणीचा मोठा भाऊ ऑफिस मधुन घरी यायला निघाला पण गेली दहा दिवस तो घरी आलेलाच नाही. ऑफिस मधुन निघताना त्याला सवय होती घरी फोन करायची, त्याप्रमाणे त्या दिवशीही त्याने फोन करुन तसे सांगीतले होते. पोलीसां कडून अजुनही महिना होत आला तरी कोणतीही बातमी नाही.
                                              दिवाळी दरम्यान एका अनाथालयात गेलो होतो. तिथल्या मुलांना खाऊ द्यायला. तिथल्या व्यवस्थापक बाईंनी बर्‍याच मुलांची कथा सांगितली. कुणाचे आई-वडिल त्यांना सोडून गेले होते तर काहिंचे आई-वडिल चुकामुक झाल्याने ही मुले हरवली होती. तिथेही हरवलेल्यांच्या गोष्टी ऎकून मन सुन्न झाले.
                                            परवा संध्याकाळी बाहेर फिरायला गेलो होतो. फिरताना अचानक एका सहकार्‍याचा फोन आला. त्याच्या सांगण्या प्रमाणे आमचे एक जुने सहकारी दोन आठवड्यापुर्वी सकाळी घरातुन गेले ते अजुन परतले नव्हते. ही बातमी ऎकल्या पासुन मनात एकच प्रश्न घर करुन आहे हे सर्व लोक कुठे गेले असतील ? काय झाले असेल यांचे ? जीवंत असतील कि कोणी काही बरे वाईट तर केले नाहीना ? मारुन टाकले असेल तर या लोकांचे शव किंवा जवळ बाळगलेल्या वस्तु कुठे तरी सापडायला हव्यात.
                                            या बातम्या ऎकल्या पासुन वेगवेगळ्या वेबसाईट्स चाळल्या कि कुठे काही वाचायला मिळेल का. कारण हे सर्व हरवलेले लोक कोणत्याही स्वरुपाच्या गुन्हेगारीतले नव्हते. सामान्य माणसाच जीवन जगणारी ही माणसे, यांना पळवणार तरी कोण ? आणि पळवून तरी काय करणार ? असंख्य प्रश्नांनी तर गेले चार दिवस डोख्याचा भूगा झालाय.
                                             वेबसाईट्स चाळताना मुंबईतल्या दोन इंग्रजी वर्तमान पत्रातील बातम्या वाचल्या कि रोज जवळपास पन्नास माणसे मुंबईतुन हरवतात, महिन्याला हाच आकडा हजारच्यावर जातॊ. पोलीस दलात अशा हरवलेल्या माणसांना शोधायला एक टीम असते पण कमी कर्मचारी असल्यामुळे या टीमला इतरही कामे करावी लागतात व त्यामुळे हरवलेल्या माणसांचे शोध घेणे त्यांना अवघड होते.
                                             मुंबई पोलीसांच्याच एका बातमी प्रमाणे २०१० मधे १०८५२ माणसे हरवली होती त्यापैकी ८२१८ जणांना शोधण्यात मुंबई पोलीसांना यश आले. तरी प्रश्न उरतो राहिलेल्या २६३४ जणांचे काय झाले ? या लोकांना मारण्यात आले कि ....... हे सर्व जण स्वत:च शोध घेणे कठीन व्हावे अशा जागी लपुन बसले आहेत ? जर जीवंत असतील तर घरी जायला यांचा जीव घाबरत नाही काय ? घरी जावस वाटत नाही काय ? घरात अस काय होते कि आपले घर आपली नवरा / बायको, मुले नकोशी व्हावीत ? आपल्या नंतर घरच्या लोकांचे होणारे हाल यांना छळत नसतील का ? डोक्यात परिणाम झाला असल्यास हेच लोक जवळपास तरी कुठे दिसायला हवेत ना ?

                                            मी बर्‍याच अशा प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. मदत करू शकाल ?

शनिवार, १ जानेवारी, २०११

नकुसा.

जग रोज प्रगति करत आहे. रोजच काहितरी नविन शोध लागताहेत. विज्ञान उद्या काय नविन देईल याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. मोबाईलही स्मार्ट होतोय. आजच्या वेगाच्या २०० पट वेगाने चालणारा संगणक लौकरच बाजारात येतोय. पण आमचा सातारा जिल्हा मुलींची नावे नकुसा ठेवतोय. वर्तमान पत्रात ही चिड आणणारी बातमी वाचली व मागासलेपण म्हणजे काय याचा उलगडा झाला.
मुलाची ईच्छा असताना मुलगी झाली तर तिचे नाव नकुसा ठेवायची पद्धत महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात आहे हे वाचुन आश्चर्य वाटले व चिडही आली.
सातारा जिल्हा परिषदेने "नकुसा" नावाच्या मुलींची मोजणी केली असता संपूर्ण जिल्ह्यात या नावाच्या २२२ मुली आढळल्या. सांगली जिल्हा परिषद या मुलींची नावे येत्या जागतिक महिला दिनाला म्हणजे ८ मार्च २०११ला बदलणार आहे.
शाळेत हजेरी देताना आम्हाला लाज वाटते असे या मुलींचे म्हणणे आहे. हो लाज वाटणारच. आपल्याला कसे माय-बाप मिळालेत याची या मुलींना नक्किच लाज वाटत असेल. स्वत:ची लाज वाटावी असे या मुलींनी काय केले ?