मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

रक्तदान.

परवा रविवारी संध्याकाळी फिरायला जाताना रस्त्यातले खड्डे चुकवता चुकवता एका बेसावध क्षणी एका खड्ड्यात पाय पडला ! पाय पडताच तो मुरगळला, त्यामुळे गेले तीन दिवस पाय दुखीने त्रस्त होतो व आज कॉलेजला गेलोच नाही. सहसा मी सकाळी email चेक करायच्या भानगडीत पडत नाही. संध्याकाळी घरी आल्यावर ते काम निवांत करता येते. आज घरी असल्यामुळे सकाळी ई-मेल बघायला बसलो तर त्यात Indianblooddonors ची मेल बघितली. माझा बदललेला मोबाईल क्रमांक त्यांना कळवलेला नसल्याचे आठवले व त्या प्रमाणे नविन क्रमांक त्यांच्याकडे रजिस्टर केला.
श्री. खुश्रु पोचा
http://www.indianblooddonors.com/ ही साईट नागपुरच्या खुश्रु पोचा व त्यांच्या पत्नि दोघे चालवतात. १९९९ मध्ये रक्त न मिळाल्याने त्यांना एका दुखद प्रसंगाला सामोरे जावे लागले, त्यानंतर दोघांनी ही साईट सुरु करुन आपले सर्वस्व, कुणाला रक्त न मिळाल्याने अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागु नये यासाठी अर्पण केले व आज पर्यंत अनेकांना या सेवेचा लाभ झाला आहे. (पोचांबद्दल परत कधितरी लिहीन.)
माझा नविन मोबाईल क्रमांक त्यांना कळवताच एक SMS आला, परत रक्तदान करणार का ? मी हो असे उत्तर देताच थोड्यावेळातच एक फोन आला, आपण रक्तदान करायला तयार आहात असे आपण कळवले आहे आत्ता येत असाल तर चांगले होईल. मी येतो म्हणताच त्यांनीच सांगितले एका दिड वर्षाच्या मुलीला रक्ताची तातडीची गरज आहे कारण तिला Thalassemia झालेला आहे व तिला रक्त देणे गरजेचे आहे.
नियमीत रक्तदाता असल्याने रक्त देणे इतकेच माहित होते. ते कुणाला देण्यात येणार याचे मला काही कर्तव्य नव्हते. पण आज दिड वर्षाचे वय ऎकताच राहवले नाही व परत एकदा रक्तदानाचे पुण्य कमावता आले.
रक्तदान काही तथ्ये:
१. १८ वर्षाच्या वर असलेला व ५० किलोच्या वर वजन असलेला कुणीही रक्तदान करु शकतो.
२. आपल्या अंगात सुमारे ६ लिटर रक्त असते, त्यातील फक्त ३५० मिली रक्त काढण्यात येते जे पुढील ४८ तासात परत तयार होते.
३. रक्तदान केल्याने कोणताही थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही.
४. रक्तदान केल्यावर परत रक्त तयार होण्यासाठी कोणतेही औषध घ्यावे लागत नाही.
५. रक्त अतिशय सुरक्षीत पद्धतीने काढण्यात येते.

तर बघा आपले रक्त कुणाच्या कामी आले व त्याचा जीव वाचवता आला तर.

SMS Now ! A Life Depends on it.


Want to Donate Blood

SMS BLOOD (Std Code) (Blood Group) To 09665500000
 
Need Blood Donors


SMS DONOR (Std Code) (Blood Group) to 09665500000

शनिवार, २५ सप्टेंबर, २०१०

व्यवस्थापन कला कि शास्त्र ?

  गरज हि शोधाची जननी असते अस म्हटल जाते. बर्‍याच अंशी हे खर आहे. प्रश्न पडल्यावरच तर उत्तर शोधणार ना !
 एकदा जपान मध्ये एक माणुस काही घरघुती सामान घ्यायला गेला. त्याच्या वस्तुंमध्ये अंगाच साबणही होत. त्याने शेल्फ मधुन साबणाचा पॅक काढला व बास्केट मध्ये घातला. बिल देताना काऊंटरवर लक्षात आले कि साबणाच्या त्या पॅक मध्ये साबणच नाही. ग्राहकाला नविन पॅक देण्यात आला व संबंधित साबण कंपनीला झालेला प्रकार कळवण्यात आला. कंपनीला हा प्रकार कळताच एक चौकशी समिती गठीत करण्यात आली. एका अभियंत्याला त्या समितीचा प्रमुख करण्यात आले व हा प्रकार घडलाच कसा याचा शोध घेण्यास सांगण्यात आले. याशिवाय असा प्रकार परत घडू नये यासाठी उपाय सुचवायला सांगण्यात आले.

समितीने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणॆ बैठकींवर बैठकी घेण्यास सुरुवात केली.

समितीतल्या अभियंत्यांनी एक नविन मशिन बसवण्यास सांगितली  X-ray च्या आधारे सर्व पॅक बरोबर भरले आहेत कि नाहित हे त्या मशिनने कळणार होते. अशी मशिन बसवण्यास बराच कालावधी व पैसा लागेल व तो व्यवस्थापनाने मान्य करावा असेही अहवालात लिहीण्यात आले व व्यवस्थापनानेही मागणी मान्य केली.

मधल्या कालावधित कामगारांनी प्रत्येक पॅक भरला असल्या शिवाय पुढे पाठवू नये असेही सांगण्यात आले. या कसरतीत कारखान्याची उत्पादन क्षमता बरिच कमी झाली.

हा सर्व प्रकार एक कामगार बघत होता त्याने एक प्रयोग करायचे ठरवले. त्याने व्यवस्थापनाला एक पंखा द्यावा असे सांगितले. पंखा मिळाल्यावर तो पंखा त्याने साबण पॅकमध्ये भरण्याच्या मशिन नंतर असेंब्ली लाईनवर अशाप्रकारे लावला कि पंख्याच्या वार्‍याने डबा रिकामा असल्यास असेंब्ली लाईन वरुन उडून बाजुला पडेल.

अशा प्रकारे कंपनीचा बराच पैसा वाचवल्याचे बक्षिस त्या कामगाराला देण्यात आले.

रविवार, १९ सप्टेंबर, २०१०

अबब !

आज संध्याकाळी घरी आल्यावर चहा वगैरे आटोपून ई-मेल बघायला बसलो. तब्बल ४३ ई-मेल्स बघुन पहिल्यांदा तर घाबरलोच. मला सर्व मेल डाऊनलोड करुन शांतपणे Windows Live Mail मध्ये वाचायला सोयीस्कर वाटते. सर्व मेल्स डाऊनलोड व्हायला बराच वेळ लागला, कारण बर्‍याच मेल्सला Attachments होत्या. माझ्या सर्व मेल्स Windows Live Mail मधिल सोयीमुळे वेगवेगळ्या Folders मध्ये जातात व त्याप्रमाणे सर्व ओळखीच्या किंवा Contacts मधिल लोकांच्या मेल्स मी प्रथम वाचत असतो. फार महत्वाच्या नसल्यास त्या कायमच्या बाद करणे सोपे होते. त्यानंतर इतर मेल्स वाचण्यात येतात व सर्वात शेवटी सगळ्या फॉर्वर्ड्स !!!
पण एक एक मेल बघून आनंद गगनात मावेना. एक दोन मेल्स जून्या मित्रांच्या होत्या बरेच दिवसात संवाद नसलेल्या मित्रांकडून आलेल्या मेल्स नक्किच आनंद देतात !

तीन मेल्स गणेशोत्सवामुळे, गणपतीच्या छायाचित्राच्या होत्या सोबत नेहमीचेच आवाहन, २० जणांना पाठवण्या बद्दलच, अन्यथा गणपती बाप्पा कोपणार गणपती बाप्पा इतक्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करणार्‍या भक्तांचे भले करणे सोडून माझ्यावर कसे कोपणार ? या मेल फॉरवर्ड न केल्याने गणपती बाप्पा नव्हे तर हे सर्व ई-मेल पत्ते गोळा करणारे व त्यानंतर ते विकणारे नक्किच कोपणार हे मला माहितेय !

फॉर्वर्ड्स मध्ये दुसरी श्रेणी कुठले कुठले इंटरनेटवरले फोटो असणारी. हे सर्व लोक असले फोटो मला पाठऊन काय साध्य करताहेत तेच जाणे. असले बरेच ओळखीच्या लोकांना मी स्पॅम मध्ये घातले आहे. यामुळे या लोकांनी पाठवलेल्या महत्वाच्या मेल्स पण स्पॅम ठरवल्या जातात. हे या लोकांना कळेल तो सुदिन !

यानंतर कधि काही खरेदी करताना देण्यात आल्यावर ई-मेल पत्ता विकणार्‍या व विकत घेणार्‍या व्यावसायीकांच्या. बहुतेक तर लगेचच Delete बटन दाबून संपवल्यात !

सर्वात शेवटी अति महत्वाच्या पराकोटीचा आनंद देणार्‍या मेल्स ! अहो असे विचारात काय पडलात. असल्या मेल्स मला फार्फार आवडतात. हजारो कोटीच्या लॉटरीचे बक्षिस देणार्‍या ! या सर्व मेल्स खर्‍या असत्या तर मी नोकरी सोडली असती व बिल गेट्सला माझ्याकडे नोकरीला ठेवू शकलो असतो !!!

शनिवार, १८ सप्टेंबर, २०१०

माकड.

एक जंगल होत. त्यात एक कुत्रा रहायचा. एकदा काय झाल त्या कुत्र्याने वाघाला त्याच्याचकडे येताना बघितले. कुत्रातर घाबरलेला होता पण त्याने हिंमत करुन जवळच पडलेल हाडकू चघळायला सुरुवात केली. वाघ जवळ आलेला बघितल्यावर कुत्रा जोरात म्हणाला,"काय चवदार वाघ होता," आणि वाघाला ऎकू जाईल इतक्या मोठ्याने ढेकर दिली.
वाघाने त्याचे ऎकले व म्हणाला,"अरे हा तर वाघाला खाणारा कुत्रा दिसतोय, इथुन गेलेले बरे. उगाच जीव जाईल."
जवळच्या झाडावर एक माकड बसले होते. ते माकड सर्व बघतच होते. त्याला वाटले आपण सर्व खरखर वाघाला सांगीतल तर वाघासोबत मैत्री होईल व जंगलात आपल्याला कोणताही धोका रहाणार नाही.
माकड उड्या मारत मारत वाघाच्या दिशेने निघाले. थोड्या अंतरावरच त्याने वाघाला पकडले व खर काय ते त्याला सांगीतले.
वाघ म्हणाला अस व्हय, बघतोच त्या कुत्र्याला आता. वाघाने माकडाला पाठिवर बसवले व दोघेही निघाले कुत्र्याच्या दिशेने.
वाघाला परत आपल्या दिशेने येताना बघून कुत्रा पुन्हा हाड चघळायला लागला. ते जवळ आल्यावर मोठ्ठ्याने ओरडला अरे किती वेळ झाला, माकड वाघाला घेऊन परत आला नाही. मला तर फार भूक लागलीय. एक चांगला वाघ खायला मिळायला हवा.तात्पर्य : आपल्या सोबत असे बरेच माकड असतात. त्यांना ऒळखून रहावे !

सोमवार, १३ सप्टेंबर, २०१०

प्रगति ?

बरेच वर्षांपूर्वी आमच्या गावात दूरदर्शन नव्हत. गावातल्या एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्ति कडेच फोन असायचा.  मोबाईल नावाची गोष्ट कल्पनेच्या बाहेरची होती. सामान्य माणसाची कमाई मोजकिच असायची. वाण्याच्या दुकानात लेस, कुरकूरे वा तत्सम खाद्य पदार्थांची पाकिटे दिसत नव्हती. टेप रेकॉर्डर ज्याच्या घरी तो भाव खात असे. सामान्य माणुस रेडिओची वार्षिक लायसन्स फी भरुन मोठ्या आनंदाने गाणे ऎकत असे. शेतीवाणी पासुन बातम्या ऎकणे हा त्याचा सुखाचा खुराक असायचा. तरिही तो सुखी होता.
आज मुलांना कळायला लागल की त्यांना मोबाईल हवा असतो, iPod कानाला लावूनच दिवसाची सुरवात होते, घरात २४ तास चालणारे TV चॅनल्स आहेत, करमणूकीचे हजार मार्ग आहेत, बाजारात गेल्यावर गरजेच्याच नव्हे तर बिन गरजेच्या कित्येक वस्तु खरेदी करायची ताकद आहे. आठवून बघा आपला DVD Player शेवटचा कधी वापरला होता. घरातल्या सिडी किती दिवसात वापरल्या नाहीत. साध्या सिनेमा घरातली ढेकूण, डास नको व त्यामुळे मल्टी-प्लेक्स शिवाय सिनेमा बघवत नाही. तरिही आज आम्ही सुख शोधायला भिरभिरत्या नजरेने बुवा-बाबाच्या पायाशी लोळण घालतोय.
याला प्रगती म्हणायची ?
सहजच विचार करताना मला एका काकांची आठवण झाली. त्यांच्याकडे २२०० रुपयाचा जुना मोबाईल आहे. (ते आपला मोबाईल रात्री आठ ते सकाळी आठ बंद ठेवतात. त्यांच्या मते मोबाईल फक्त संवाद साधायला वापरायला हवा. त्यात कॅमेरा काय कामाचा ?) मोबाईल बदलणे त्यांना पटत नाही. त्यामुळे जुना मोबाईल खराब झाल्यावरच ते तो बदलणार आहेत.
आपण आपल्या कडे नविनतम वस्तु असावी या अट्टाहासापायी किती वस्तु न वापरताच किंवा फार कमी वापरुन बदलतो व या सगळ्या उलाढालीत किती पैसा व्यर्थ घालवतो. बर एक वस्तु विकत घेतल्यावर लगेच महिन्यातच त्यापेक्षा चांगली नविन आवृत्ती येते व आपण परत विचार करायला लागतो अरे थोडे थांबलो असतो तर ?
सुख कशात आहे ?

शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

मारबत.

इंग्रजांचा अन्याय , अत्याचार सुरु असताना लोकांनी एकत्र यावे व समाजाला त्यापासुन काही संदेश देता आलातर अधिक चांगले या भावनेने नागपुर तसेच आसपासच्या परिसरात गेली सुमारे १३० वर्षे मारबत तसेच बडग्याची मिरवणुक काढण्यात येते.
श्रावण अमावस्या म्हणजेच पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. या दिवशी काळी, पिवळी मारबत तसेच बडग्याचा, सहा ते आठ फुट उंचीचा, पुतळा कागद, बांबू व कापड वापरुन तयार करण्यात येतो. या पुतळ्यांची सकाळी सात आठच्या सुमारास पुजा करण्यात येते व मिरवणुकीने हे पुतळे गावाबाहेर नेऊन जाळण्यात येतात वा तलावात विसर्जीत करण्यात येतात. 

पिवळी मारबत
मिरवणुकीत त्या त्या वर्षीच्या सामाजिक प्रश्नांवर आधारीत घोषण्या दिल्या जातात. या घोषणा फारच मजेशिर असतात जसे महागाई वाढली तर "महागाईले घेवून जा गे मारबत."  किंवा "स्वाईन फ्लू ले घेवून जा गे मारबत." अशा मोठ्य़ाने व अति उत्साहात नारे देत मिरवणुक ढोल ताश्यांच्या गजरात नागपुरात फिरते.
नागपुर सोबतच जवळच्या गावात मारबतीची मिरवणुक निघत असली तरी नागपुरातली मिरवणुक बघायला बरीच गर्दी होते.

काळी मारबत
 

रविवार, ५ सप्टेंबर, २०१०

शिक्षक दिन.

आज शिक्षक दिन. आपल्याला शिकवण्यात जे शिक्षक आवडले त्या सर्वांच स्मरण करणे व आपल्या जीवनाच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा उचलणार्‍या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान देणारा नसावा असे म्हटले जाते कारण पुस्तकी ज्ञान कधिही मिळवता येते पण व्यावहारिक ज्ञान योग्य वेळेसच मिळायला हवे. माणसाच्या जीवनात व्यावहारीक ज्ञानच लौकिक दृष्ट्या उपयोगी आहे.
आजच्या या शिक्षक दिनी मला माझ्या शैक्षणीक आयुष्यात भेटलेल्या शिक्षकांचे स्मरण करणे माझे कर्तव्य समजतो. माझ्या या शिक्षकां पैकी काही शिक्षक या जगात नाहीत त्यांना माझी श्रद्धांजली वाहतो.
सर्वप्रथम मला माझ्या प्राथमिक शाळेत शिकवणारे श्री. बंसोड यांना मी कधिच विसरु शकत नाही. वर्गात शिकवताना वर्गातली शिस्त व खेळत खेळत शिकवायची त्यांची शैली मला फार आवडायची. खेळतानाच त्यांनी आमच्या कडून ज्या तर्‍हेने पाढे पाठ करवून घेतले होते ती पद्धत कायम स्मरणात आहे. शाळेत शिकवतानाच आपण समाजाच काही देण लागतो या जाणिवेने गुरुजी समाजात जमेल तसे कामही करायचे. या कामाची पावती त्यांना शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन दिली.

आमच्या शाळेतले मुख्याध्यापक श्री. पांडे हे कडक शिस्तीचे होते. त्यांचे लक्ष कायम सर्व विद्यार्थ्यांवर असायचे. कधितरी सर व्यावहारीक गोष्टीपण सांगायचे ज्या मुळे व्यवहारात एखादी चुक झाल्यास आजही सरांची आठवण येते.

माध्यमीक शाळेत गेल्यावर आम्ही थोडे मोठे झालो होतो. अभ्यासाशिवाय हुंदडण्यात व पतंग उडवण्यात भारी लक्ष, अशा वेळेस अभ्यासात गोडवा निर्माण करण्याच मोठ्ठ काम आमच्या अंजीकर सरांनी केल. गणितात व विज्ञानात आवड वाढावी यासाठी आजही अंजीकर सर कायम प्रयोग करायचे त्यामुळे माझे गणित शाळेत असताना इतरांच्या तुलनेत फारच चांगले झाले होते. अंजीकर सरांबद्दल त्यावेळेस भिती वाटायची कारण आमचे गणित चुकले तर त्यांना फार वाईट वाटायचे. त्यांना वाईट वाटू नये हे बघण्याची जबाबदारी आमची होती !

आठवी नववी व दहावी या वर्गात असताना मनापासुन शिकवणारे शिक्षक भेटले ते सर्वच माझ्या चांगले लक्षात आहेत त्यामुळे कोणा एकाच नाव घॆण हे इतरांवर अन्याय करण्या सारख होईल असे वाटते. त्याएळेसचे आमचे स्वामी सर आज आमच्या शाळेत मुख्याध्यापक झाले आहेत. वीस वर्षांनी मागच्या वर्षी त्यांना भेटण्यात खुपच आनंद मिळाला.

अकोल्याला नोकरि लागल्यावर आमच्या कॉलेजचे प्राचार्य श्री. गाडगीळ हे मला व्यवहार शिकवणारे अजुन एक शिक्षक. माणुसकी काय असते हे गाडगीळ सरांकडुनच शिकाव. सुंदर गोष्टींच खजिनाच त्यांच्याकडॆ होता.

या सर्वांची आठवण कायमच येत असते. आज शिक्षक दिनाला मी या सर्वांना कसे विसरणार ?

शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०

देवदूत !

माझी देवावर श्रद्धा आहे.  देव आहे कि नाही हा माझ्यासाठी कधिच वादाचा मुद्दा नव्हता. माझ्या मते देव आहेच त्यामुळेच तर जग चाललय !
देवावर श्रद्धा असुनही मी मनासारख घडल नाही तर त्याच्यावर रागावतो, एखाद्या लहान मुला सारखा. हो, देवासमोर मी तर लहानच ना. आपली मुले नाही का आपल्यावर रागवत त्यांच्या मनाविरुद्ध केल तर. तर या रागावण्यात माझ काही चुकतय अस वाटत नाही मला.
देव स्वत: काही करतो कि नाही मला माहित नाही पण आपल्या दूतांकरवी तो नक्किच बरिच कामे करवतो. आपण त्यांना देवदूत म्हणुया.
मला सर्वात पहिला देवदूत सापडला मी आठवीत असताना. त्या वेळी पेंसिल सोलायला शार्पनर मिळत असतानाही आम्ही मात्र दाढी करायच्या जुन्या ब्लेडने पेंसिल चांगली सोलली जाते याकारणाने ब्लेडचाच वापर करित असु. कदाचित त्या वेळचे शार्पनर चांगले नसावेत. एकदा पेंसिल सोलताना ब्लेडने बोट कापल. रक्त आल व काही वेळातच रक्तप्रवाह थांबला. लहानपणी पडायची सवय असल्याने रक्त येणे यात काही नविन नव्हते. तर रक्त आपल्या गुणामुळे लगेच थांबल पण दोन आठवड्यातच हाताला प्रचंड ठणक जाणवायला लागली व आणखी काही दिवसांनी ज्या बोटाला कापल होत त्याच बोटाला फोड आले. हळूहळू हे फोड हातावर पसरायला लागले. आमचे नेहमीचे डॉक्टर त्यावेळेसच बाहेरगावी गेले होते त्यामुळे आत्याच्या सांगण्या प्रमाणे वर्ध्याला डॉक्टर वर्‍हाडपांडेंना हात दाखवला. हात बघताच डॉक्टर अस्वस्थ दिसले. काही वेळाने त्यांनी मामांना सांगीतल याच्या हाताला सेप्टीक झाले आहे व लगेच काहीतरी उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांनी रोज एक या हिशोबाने वीस दिवस एक इंजेक्शन घ्यायला सांगीतल व रोज त्यांना प्रगती कळवायची होती. वीस दिवसांनी त्यांना भेटायला गेल्यावर त्यांना झालेल्या आनंदाचे वर्णन मी येथे करु शकत नाही. त्यांनी मला जवळ घेऊन लाडावलेल मी अजुनही विसरलो नाही. बोलतांना ते म्हणाले "देव पावला".

मधल्या काळात असेच देवदूत भेटले.

मला आजपर्यंतचा शेवटचा देवदूत भेटला २००६ मध्ये. एके दिवशी जेवण झाल्यावर माझ्या कामाच्या ठिकाणी मला चालताच येईना. तसा मी ऊभा रहात होतो पण पाऊल पुढे टाकताच चक्कर यायची व औषधे घेतल्यावरही काही प्रगती नव्हती. एक्स रे काढल्यावर आमच्या डॉक्टरांनी स्पॉंडीलिसीस झाल्याचे सांगीतले. औषधांशिवाय गळ्याला कायम अडचणीचा होणारा पट्टा (कॉलर) लावायला सांगीतला. हा पट्टा मला कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्या सारखाच वाटायचा ! हा आता माझा कायमचाच सोबती होणार असी लक्षणे डॉक्टरांच्या बोलण्या वरुन वाटायला लागली. त्यामुळे मला एक मोठ्ठा फायदा मात्र होत होता. भरलेल्या लोकल मधे मला मात्र, एखादा दयाळू, रोजच बसायला जागा द्यायचा. साधारण पंधरा दिवस कॉलर वापरल्यावर तिची सवय होण्या ऎवजी जाचच वाटायला लागला.
एक दिवस मला मंगेश नावाचा शेजारच्या कार्यालयातला कर्मचारी भेटला व म्हणाला सर हा पट्टा तुम्हाला नकोसा झालेला दिसतोय. मी तुम्हाला एका डॉक्टरांकडे घेऊन चलतो. ते डॉक्टर तुमचा पट्टा चार दिवसात घालवतील.
सतत वाढत्या प्रमाणात चक्कर येण्याने मी माझा रस्त्याने चालायचा आत्मविश्वास गमावलेला होता. सोबत कुणी असल्याशिवाय रस्ता ओलांडणे मला फारच अवघड झाले होते. सोबत सौ किंवा मुलींना घेऊनच मी रस्त्याने जात होतो अशावेळी मला भेटलेला मंगेश मला देवदूत वाटला तर काय नवल. मंगेश मला त्यानंतर डॉक्टर बेरामजींकडॆ घेऊन गेला. तपासण्या दरम्यान डॉक्टरांनी काही मोजके प्रश्न विचारलेत व म्हणाले सोमवारी सकाळी ठिक आठ वाजता परत यायच. येताना कोणालाही सोबत आणायच नाही व आणल्यास मी तुला परत पाठवणार. चालायचा आत्मविश्वास गमावलेल्या मला तर हे फारच क्रुर पणाचे वाटले ! पण सोबत मंगेश होताच. मंगेश म्हणाला सर, डॉक्टर फार कडक आहेत, ते म्हणतात तसेच वागा ! त्यामुळे माझ्या कडे इतर पर्याय नव्हता, काय करणार !
सोमवारी एकटेच जायचे असल्याने कमीतकमी चालावे लागावे म्हणुन टॅक्सीने त्यांच्याकडे गेलो. पहिल्या दिवशीचे सोपस्कार आटोपले व त्यांनी सांगीतलेले योगासन शिकुन घरी आलो. दुसर्‍या दिवशी परत उपचार झाल्यावर पट्टारुपी कुबडी त्यांच्याचकडे ठेवून घरी जायला सांगीतल. (क्रुर पणाचा अजुन एक प्रकार.) कसाबसा घरी पोहोचलो व तिसर्‍या दिवशी कुबडी शिवाय जाण्याच्या मानसिक तयारीला लागलो ! असे दहा दिवस त्यांचे उपचार आटोपल्यावर त्यांनी माझी कुबडी परत केली व पाठिवर हात ठेउन  म्हणाले याची आता तुला गरज लागणार नाही, घरी घेऊन जा व शोकेसमध्ये ठेवून दे. मला खरच आज पर्यंत माझ्या त्या कुबडीची गरज भासली नाही. चार वर्षात माझा आत्मविश्वास परत आला, इतका कि मी आता दुचाकी चालवतो. डॉक्टर बेरामजींनाही मी देवदूतच मानतो.

गुरुवार, २ सप्टेंबर, २०१०

स्वदेशी.

            भारतात बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तुंमधे स्वदेशी कारखानदारांनी निर्मीलेली व परदेशी कारखानदारांनी / कंपन्यांनी निर्मीलेली अशी सरळ सरळ विभागणी करता येईल. बहुतेक ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु या परदेशी कंपन्यांनी निर्मीलेल्या आढळतात त्यात सोनी, नोकिया, सॅमसंग या परदेशी कंपन्यांनी भारतीय बाजारात चांगलेच बस्तान मांडले आहे. कुठल्या प्रकारची ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला एका विशिष्ठ कंपनीचे नाव समोर येते. उदाहरणार्थ मोबाईल फोन म्हटला कि नोकियाची आठवण आल्या शिवाय मोबाईलचा विचार करणे अशक्य आहे. तर दूरदर्शन संच घ्यायचा असल्यास सोनीचा संच आठवणारच.
          या परदेशी कंपन्यांची एक कौतुक करण्यासाराखी गोष्ट म्हणजे ते आपल्या ग्राहकांप्रती कमालिचे जागृत असतात. का नसणार त्यांना आपले दुकान वर्षानुवर्षे चालवायचे आहे ना ! तर हे दुकान चालत रहावे म्हणुन ते कायम नवनविन कल्पना आपल्या उत्पादनात जोडत जातात व आपले उत्पादन कायम ग्राहकांना मोहवत ठेवेल याची काळजी घेतात. ग्राहकाला पण वाटते आपले जुने मॉडेल जुने झाले व नविन घ्यायला हवे.  या कंपन्यांचा ग्राहकच हे दुकान कायम चालत राहिल याची काळजी घेतो.  एका ग्राहकाच्या चुकीमुळे मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यावर म्हणुनच नोकियाने आपल्या सर्व तत्सम बॅटर्‍या बदलून देण्याची तयारी दाखवली. हे सर्व करताना पानपान भराच्या जाहिराती दिल्याचे आपल्याला आठवतच असेल. त्यांनी त्यांच्या जाहिरातीत आपले ग्राहक तुटणार नाहीत याची व्यवस्थीत काळजी घेतली. चुक ग्राहकाची आहे हे माहित असुनही त्यांनी आपले नाव खराब होवू नये व ग्राहक टिकावा याची संपूर्ण दक्षता घेतलीच.
          या विरुद्ध परिस्थीती आपल्या भारतीय उत्पादनांची आहे हे सांगताना खेद होतो. ग्राहक हा या स्वदेशी कंपन्याचे उत्पादन विकत घेण्या पर्यंत राजा असतो, त्यानंतर मात्र त्याला एखाद्या भिकार्‍या सारखे या कंपन्यांना फोन किंवा इतर मार्गाने भिक मागावी लागते. या कंपन्यांना आपल्या उत्पादनातल्या तृटी दुरुस्त करुन देण्यात व ग्राहक टिकावा असे वाटतच नाही. उदाहरणार्थ: आपण Videocon या कंपनीचे कोणतेही उत्पादन विकत घेवून बघा, ते चांगले चालले तर आपले नशिब अन्यथा आपल्याला यांव्या दारात भिक मागत फिरावे लागेल.
          स्वदेशी जागरण मंचाच्या प्रेरणेने आपले बरेच ग्राहक स्वदेशी उत्पादन विकत घ्यायला लागले. या मागच अर्थशास्त्र पटल्यामुळेच त्यांनी भारतीय उत्पादनेच विकत घ्यायची असे ठरवले. खरतर जागरण मंचामुळे आपल्या कंपन्यांना एक चांगली संधी चालुन आली होती पण संधीचे सोने करण्या ऎवजी ग्राहकाच्या माथी निकृष्ट उत्पादने मारण्याचा व पैसे कमावण्याचाच व्यवसाय या कंपन्यांनी सुरु केल्याचे आढळेल.  या व्यवसाय पद्धतीमुळे बर्‍याच चांगल्या भारतीय उत्पादनांकडे ग्राहक पाठ फिरवू शकतो याची या कंपन्यांना जाणीव असल्याचे दिसत नाही.
           अशा या निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांच्या बाजारात काही चांगली उत्पादनेही आहेत व यांचा ग्राहक दिवसेंदिवस वाढत आहे हेही दखल घेण्यासारखे आहे. यात प्रामुख्याने विको वज्रदंती तसेच पितांबरी सारखी चांगली उत्पादने आहेत.  भारतातल्या मोठ्या कंपन्या जागतीक दर्जाची कामगीरी करित असतांना सामान्य ग्राहकाकडे भारतीय कंपन्या दुर्लक्ष करताहेत यात त्यांचेच नुकसान अधिक संभवते.