कुबडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुबडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०

देवदूत !

माझी देवावर श्रद्धा आहे.  देव आहे कि नाही हा माझ्यासाठी कधिच वादाचा मुद्दा नव्हता. माझ्या मते देव आहेच त्यामुळेच तर जग चाललय !
देवावर श्रद्धा असुनही मी मनासारख घडल नाही तर त्याच्यावर रागावतो, एखाद्या लहान मुला सारखा. हो, देवासमोर मी तर लहानच ना. आपली मुले नाही का आपल्यावर रागवत त्यांच्या मनाविरुद्ध केल तर. तर या रागावण्यात माझ काही चुकतय अस वाटत नाही मला.
देव स्वत: काही करतो कि नाही मला माहित नाही पण आपल्या दूतांकरवी तो नक्किच बरिच कामे करवतो. आपण त्यांना देवदूत म्हणुया.
मला सर्वात पहिला देवदूत सापडला मी आठवीत असताना. त्या वेळी पेंसिल सोलायला शार्पनर मिळत असतानाही आम्ही मात्र दाढी करायच्या जुन्या ब्लेडने पेंसिल चांगली सोलली जाते याकारणाने ब्लेडचाच वापर करित असु. कदाचित त्या वेळचे शार्पनर चांगले नसावेत. एकदा पेंसिल सोलताना ब्लेडने बोट कापल. रक्त आल व काही वेळातच रक्तप्रवाह थांबला. लहानपणी पडायची सवय असल्याने रक्त येणे यात काही नविन नव्हते. तर रक्त आपल्या गुणामुळे लगेच थांबल पण दोन आठवड्यातच हाताला प्रचंड ठणक जाणवायला लागली व आणखी काही दिवसांनी ज्या बोटाला कापल होत त्याच बोटाला फोड आले. हळूहळू हे फोड हातावर पसरायला लागले. आमचे नेहमीचे डॉक्टर त्यावेळेसच बाहेरगावी गेले होते त्यामुळे आत्याच्या सांगण्या प्रमाणे वर्ध्याला डॉक्टर वर्‍हाडपांडेंना हात दाखवला. हात बघताच डॉक्टर अस्वस्थ दिसले. काही वेळाने त्यांनी मामांना सांगीतल याच्या हाताला सेप्टीक झाले आहे व लगेच काहीतरी उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांनी रोज एक या हिशोबाने वीस दिवस एक इंजेक्शन घ्यायला सांगीतल व रोज त्यांना प्रगती कळवायची होती. वीस दिवसांनी त्यांना भेटायला गेल्यावर त्यांना झालेल्या आनंदाचे वर्णन मी येथे करु शकत नाही. त्यांनी मला जवळ घेऊन लाडावलेल मी अजुनही विसरलो नाही. बोलतांना ते म्हणाले "देव पावला".

मधल्या काळात असेच देवदूत भेटले.

मला आजपर्यंतचा शेवटचा देवदूत भेटला २००६ मध्ये. एके दिवशी जेवण झाल्यावर माझ्या कामाच्या ठिकाणी मला चालताच येईना. तसा मी ऊभा रहात होतो पण पाऊल पुढे टाकताच चक्कर यायची व औषधे घेतल्यावरही काही प्रगती नव्हती. एक्स रे काढल्यावर आमच्या डॉक्टरांनी स्पॉंडीलिसीस झाल्याचे सांगीतले. औषधांशिवाय गळ्याला कायम अडचणीचा होणारा पट्टा (कॉलर) लावायला सांगीतला. हा पट्टा मला कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्या सारखाच वाटायचा ! हा आता माझा कायमचाच सोबती होणार असी लक्षणे डॉक्टरांच्या बोलण्या वरुन वाटायला लागली. त्यामुळे मला एक मोठ्ठा फायदा मात्र होत होता. भरलेल्या लोकल मधे मला मात्र, एखादा दयाळू, रोजच बसायला जागा द्यायचा. साधारण पंधरा दिवस कॉलर वापरल्यावर तिची सवय होण्या ऎवजी जाचच वाटायला लागला.
एक दिवस मला मंगेश नावाचा शेजारच्या कार्यालयातला कर्मचारी भेटला व म्हणाला सर हा पट्टा तुम्हाला नकोसा झालेला दिसतोय. मी तुम्हाला एका डॉक्टरांकडे घेऊन चलतो. ते डॉक्टर तुमचा पट्टा चार दिवसात घालवतील.
सतत वाढत्या प्रमाणात चक्कर येण्याने मी माझा रस्त्याने चालायचा आत्मविश्वास गमावलेला होता. सोबत कुणी असल्याशिवाय रस्ता ओलांडणे मला फारच अवघड झाले होते. सोबत सौ किंवा मुलींना घेऊनच मी रस्त्याने जात होतो अशावेळी मला भेटलेला मंगेश मला देवदूत वाटला तर काय नवल. मंगेश मला त्यानंतर डॉक्टर बेरामजींकडॆ घेऊन गेला. तपासण्या दरम्यान डॉक्टरांनी काही मोजके प्रश्न विचारलेत व म्हणाले सोमवारी सकाळी ठिक आठ वाजता परत यायच. येताना कोणालाही सोबत आणायच नाही व आणल्यास मी तुला परत पाठवणार. चालायचा आत्मविश्वास गमावलेल्या मला तर हे फारच क्रुर पणाचे वाटले ! पण सोबत मंगेश होताच. मंगेश म्हणाला सर, डॉक्टर फार कडक आहेत, ते म्हणतात तसेच वागा ! त्यामुळे माझ्या कडे इतर पर्याय नव्हता, काय करणार !
सोमवारी एकटेच जायचे असल्याने कमीतकमी चालावे लागावे म्हणुन टॅक्सीने त्यांच्याकडे गेलो. पहिल्या दिवशीचे सोपस्कार आटोपले व त्यांनी सांगीतलेले योगासन शिकुन घरी आलो. दुसर्‍या दिवशी परत उपचार झाल्यावर पट्टारुपी कुबडी त्यांच्याचकडे ठेवून घरी जायला सांगीतल. (क्रुर पणाचा अजुन एक प्रकार.) कसाबसा घरी पोहोचलो व तिसर्‍या दिवशी कुबडी शिवाय जाण्याच्या मानसिक तयारीला लागलो ! असे दहा दिवस त्यांचे उपचार आटोपल्यावर त्यांनी माझी कुबडी परत केली व पाठिवर हात ठेउन  म्हणाले याची आता तुला गरज लागणार नाही, घरी घेऊन जा व शोकेसमध्ये ठेवून दे. मला खरच आज पर्यंत माझ्या त्या कुबडीची गरज भासली नाही. चार वर्षात माझा आत्मविश्वास परत आला, इतका कि मी आता दुचाकी चालवतो. डॉक्टर बेरामजींनाही मी देवदूतच मानतो.