शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०

मोह !

परवा चतुर्थीला टिटवाळ्याला गेलो होतो. बरेच दिवसात जायचे होते. अचानक जोड्याने जायचा योग आला !  दर्शनाला तोबा गर्दी आणि मोठ्ठी रांग. गणपतीच्या कृपेने पायाने त्रास अजिबात दिला नाही. संपूर्ण रांगेने जात त्या चक्रव्युहातुन बाहेर पडायला एक तास लागला. गर्दीतही दर्शन छान झाल्याचा आनंद झाला.
मंदिरात जाताना गर्दीच्या काळजीने सरळ लोकलमधुन उतरुन बाहेर पडलो, कुठेही न पहाता थेट दर्शनाच्या रांगेत लागलो. दर्शन घेतल्यावर मात्र परत यायची घाई नसल्याने डोळे उघडे ठेवून निघालो आणि टिटवाळा स्टेशन अगोदर "अनंत हलवाई"चे दूकान दिसले. काय वर्णावा तो आनंद. खरतर माझ्या पोटाच्या वाढलेल्या घेराला तेच जबाबदार आहेत. चांगले खायची सवय या अनंत हलवाईच्या कल्याणच्या दुकानानेच मला लावली !
मागच्या महिन्यात पायाला झालेल्या इजेने, थोडे खाण्यावर ताबा ठेवा हा डॉक्टरचा सल्ला महिनाभर इमाने इतबारे पाळतोय मात्र परवा "अनंत हलवाई" हा दूकानावरचा बोर्ड बघुन, डॉक्टरच्या सल्ल्याकडे थोडे दूर्लक्ष केले. बरेच दिवसांनी त्यांच्या कडचे काही खायला मिळणार होतेना ! अनंत हलवाईंचे श्रीखंड, हलवा, पेठा, जिलेबी, ढोकळा, पेढा असे किती तरी पदार्थ आहेत ज्यांना मी कल्याण सोडल्या पासुन खरोखरच मुकलोय ! तरिही कोणत्याही कामासाठी कल्याणला गेलोतर माझी अनंत हलवाईला भेट असतेच. चांगले पंधरा दिवस पुरतील इतका साठा घेऊन येतो व त्यानंतर दोन महीने घरी बोलणे खातो !
अनंत हलवाई कडील पदार्थांसोबतच मला जीभेवरचा ताबा सोडायला लावणारा पदार्थ म्हणजे कचोरी. कचोरी म्हणताच चांगली फुगलेली कचोरी डोळ्यापुढे येते, त्यात छान चटणी टाकून थोडी शेव भरुन खाणे एक छान पद्धतशीर कार्यक्रम असतो. पण नागपुरला जाताना येताना शेगावला गाडी थांबताच शर्माजींची स्टेशनवर मिळणारी कचोरी मी कधिच चुकवत नाही.
शर्माजींनी आपली कचोरी ठाण्यातच उपलब्ध करुन दिल्याने माझी बर्‍यापैकी सोय झाली आहे. त्यांचे दुकान गावदेवी मैदाना जवळच आहे. स्टेशनपासुन अगदी हाकेच्या अंतरावर !
संध्याकाळी फिरायला फार लांब जायचे नसेल तर राम मारुती रोडवर जायला मला आवडते. या रस्त्याच्या एका टोकाला संत गजानन महाराजांचे मंदिर आहे तर दुसर्‍या टोकाला समर्थ भांडार, समर्थ भांडारा जवळच पोटाची घेरी वाढवायला एक उत्तम ठिकाण आहे "राजमाता", येथील वडापाव वा समोसा मला आवडतो पण मला त्यापेक्षा जास्त आवडते त्या जवळच असलेले राजमाताचेच मसाला कोकम सोडा. मला याचा मोह आवरतच नाही.
पुढच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे घरचे पदार्थ असतीलच, डॉक्टरांचा सल्ला डावलता येणार नाही पण घरच्या पदार्थांना न्याय तर द्यायलाच हवा ना !

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

बदलते समाजजीवन - २ शाळा.

समाजात घराबाहेर पडल्यावर पहिला संबंध येतो तो शाळेचा. शाळेतच मुले अभ्यास, खेळ, सामान्य ज्ञान तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी लागणारे सर्व शिकतात. शाळेतील दिवस कोणत्याही माणसाला न विसरता येणारे असतात. एखाद्या लहान मुलासमोर त्याच्या शाळेला नावे ठेवून बघा, त्याची प्रतिक्रिया किती तीव्र असते, त्याच्या प्रतिक्रियेतच त्याचे त्याच्या शाळेबद्दलचे भावविश्व दिसते. त्यामुळेच शाळेला नावे ठेवलेली मुले सहन करु शकत नाहीत.
पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे पुर्वी एका वर्गात ३५ ते ४० मुले असायची तर आज ही संख्या बरीच वाढली आहे, काही ठिकाणी ६० ते ७० मुलेही वर्गात आढळतात.
३५ ते ४० मुले असलेला वर्ग सांभाळणे, वर्गाला शिकवणे व हे करत असताना शिक्षक त्या मुलांच्या जीवनात एक महत्वाचा भाग होऊन जायचा.  त्यावेळेस शिक्षक हा शिक्षकच असायचा. त्यामुळेच त्याला तसे करणे सोपे जायचे.
आज ६० ते ७० विद्यार्थ्यांच्या गराड्यात शिक्षक आपल्या कामाला न्याय देवू शकत नाही. त्यात त्याला जर निवडणुका ते जनगणना असे कार्यक्रम दिलेत तर, शिक्षकाने आपला अभ्यास कधि करायचा ? केलेल्या अभ्यासावर चिंतन कधि करायचे ?
शिक्षक व्यस्त व त्रस्त आणि विद्यार्थी मोकाट.

शिक्षकाला असली कामे देण्याने तो आपल्या दैनंदिन कामात लक्ष घालु शकत नाही. त्यामुळे वर्गाकडे होणार्‍या दुर्लक्षाचा गैरफायदा मुले उचलतात. अभ्यास न करणे व शालेय विद्यार्थ्याने करु नये असे बरेच उपद्व्याप शाळेतील मुले करताना दिसतात जसे वर्गातील मुलींना छेडणे, असभ्य शब्दांचा वापर, पालक तसेच शिक्षकांबद्दल अर्वाच्य शब्दांचा वापर इ. त्यामुळेच तीसर्‍या वर्गातला मुलगा आपल्या वर्गमित्रावर कात्रीने वार करु शकतो.

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

बदलते समाजजीवन - १ :

घरी दोन तीन भाऊ बहिण, शेजारीच काका काकू, चुलत भाऊ बहिण, पलिकडे जुने वडिलांचे स्नेही ज्यांना काकाच म्हटले जायचे, शाळेत वर्गात ३५/४० मुले/मुली शिक्षकांना सर्वांची नावेच नव्हेत तर घरी कोण आहेत याची माहिती असायची, अशा वातावरणात मुलांकडे / मुलीकडे लक्ष देणारे बरेच असायचे. त्यामुळे जरा काही वाकड वागल तर घरी संध्याकाळी पाठिवर फटाके फुटायचे, शिमगा व दिवाळी एकाच दिवशी !
जरा मोठे झाल्यावर न कळणारी पण शासनाच्या कृपेने सर्वत्र झळकणारी जाहिरात बघायला मिळायची, "छोटे कुटूंब सुखी कुटूंब". पत्र्यावर छापलेली व भिंतीवर गेरुने रंगवलेली हि जाहिरात त्यावेळी हमखास दिसायची.
छान होते ते दिवस. फारशा सोयी नव्हत्या पण सर्वच सुखी दिसायचे. सणासुदीला घरी जेवायला कुणीतरी असायचेच. मजा यायची त्या पंगती बघताना. कधितरी त्या पंगतीत वाढायला मजा यायची. पुढे पुढे हे सर्व कमी झाले. सख्खेच लांबच्या गावाला नोकरिला. गावात फक्त आई वडिल आणि दोन बछडे, हाच संसार, हेच विश्व. कालांतराने आई पण घर खायला ऊठते म्हणुन किंवा शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणुन नोकरिला.
आईच्या हातचे फक्त सणाला, इतर वेळेस शेजारच्या वाण्याकडून मॅगी आणले कि दोन मिनीटात तयार, घरी कंटाळा आल्यावर मित्रांसोबत खेळायला मजा यायची. त्यानंतर एका मोठ्ठ्या राक्षसाने घराघरात प्रवेश केला पण हा राक्षस संध्याकाळी काहिच वेळ दिसायचा त्यामुळे सर्वांचे लक्ष घड्याळाकडे असायचे. हा TV  नामक राक्षस काही वेळ खाऊन बंद व्हायचा, चांगली करमणुक करायचा. काही वर्षांनी या राक्षसाने आपली पकड अधिकच घट्ट केली. जेमतेम चार तास खाणारा हा राक्षस चोवीस तास घरातच रहायला लागला. तेथेच समाजजीवनाच्या बदलाची सुरुवात झाली. मुलांचे घराबाहेर खेळणे कमी झाले व TV समोरचा वेळ वाढायला लागला. समोर  कुरकूरे व TV, येथेच आयुष्याच्या कुकूरीने पण सुरुवात केली. चोवीस तास TV वर काय दाखवायचे ? हा एक मोठ्ठा पश्न निर्मात्यांपुढे. ते तरी काय करणार. हा प्रश्न सोडवायला त्यांनी पण अतिशय आक्रमकतेने आपले कार्यक्रम राबवणे सुरु केले. पोट भरायला प्रतिस्पर्ध्या पुढे रहायला हवेच यातुनच या TV चॅनल्सचा आक्रस्ताळेपणा वाढायला लागला. बातमी कशा प्रकारे कव्हर करायची याला धरबंध राहिला नाही व मालिकां मध्ये तोचतो पणा जाणवायला लागला. रियालिटी शो ने तर सर्वच बंधने झुगारलेली दिसतात.

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०१०

हजारे.

मला माहितेय मी फार चांगला लेखक नाही. पण लिहून बघायला काय हरकत आहे या विचाराने हा ब्लॉग सुरु केला. लिहीता आल तर ठिक अन्यथा एक दिवस बंद करणे आपल्या हातात आहे ना ! माणुस असल्याने मलापण भावना आहेतच, त्याच भावना येथे उतरवतोय. वाचकांना आवडल्यास नक्किच टिप्पणी देतात न आवडल्यास तसेही सांगतात. यामुळे इतरांचे विचारही कळतात. आपले विचार चुकिचे असल्यास बदलायला तितकाच वाव.
या ब्लॉगवर लिहायला सुरुवात केली ४ जुलै २०१० ला. वाटले नव्हते कि वाचकांचा १०० आकडा पार करेल. पण आजचा १०००+ आकडा बघितला व चांगले वाटले. फार समाधान नाही कारण काही मोजक्याच प्रतिक्रीया मिळाल्यात. प्रतिक्रीया कमी असल्याने मी जे लिहीतोय ते इतरांना आवडते की नाही हे कळायला मार्ग नाही.
१००० चा आकडा गाठायला ज्यांची मदत झाली त्या सर्वांचे मनापासुन आभार !

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०

मिडिया !

शेकडो चॅनल्स सर्फ करत असताना आपल्याला आवडेल असे काही दिसत नाही व उगाच आपण मिडियाच्या नावाने बोटे मोडत बसतो. मालिका असो किंवा बातम्या, नको नको ते दाखवले जाते. घरात वा समाजात कधिही न दिसणारी भांडणे किंवा भानगडी हे सर्व आपण कोणत्याही मालिकेत बघु शकतो. कालच कुठली तरी हिंदी मालिका बघत असतांना त्यातील कलाकार ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर करित होते ते बघुन तर चॅनल बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. बातम्यांची पातळी तर बोलूच नये इतपत घसरलीय. चॅनल सुरु केले आहे तर ते चालवावे लागेल तर दाखवा जे काही शक्य आहे ते अशिच बहुदा मानसिकता असावी या चॅनल मालकांची.  TRP के लिए कुछ भी करेगा !
रेडिओ लावावा तर तेच, रेडिओ जॉकि नावाची नविन जमात असंबद्ध बडबड करण्यात तरबेज असते. मनात येईल ते वाट्टेल तितके बोलायचे व आपली वेळ संपली कि पुढच्याला बडबडण्यासाठी खो द्यायचा. हे सर्व चोवीस तास चालु द्यायचे.
समाजातही या सर्व मालिकांचे दुष्परिणाम दिसतात पण एक चांगला परिणाम पण झालाय ! ह्या शेकडो चॅनल्सना लागणारा कामगार वर्ग. एक चॅनल किमान दोनशे जणांच पोट भरते. एक मालिका तयार करताना स्पॉट बॉय पासुन सर्व कलाकार यांची संख्या २५० च्या वर जाते.  सर्व चॅनल्स धरलेत तर कमितकमी दोन ते तीन लाख माणसांचे पोट यावर अवलंबून आहे.
तर मालिका, बातम्या बघा अथवा बघू नका या सर्वांचे पोट भरतेय यात आनंद माना !