दिवाळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिवाळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

दिवाळी.

सर्वप्रथम या माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना ही दिवाळी अत्यंत आनंदाची जावो हि शुभेच्छा.
काल मुलीची परिक्षा संपली. शाळेतुन तीला घरी आणताना मी नेहमी थोडा तयारीतच होतो, आज परिक्षा संपली चला आता मला फटाके घेऊन द्या अशी मागणी आल्यास तीला नाराज न करता सरळ तिच्या सोबतच दुकाना गाठायचे व म्हणेल त्यातले आवाज कमी करणारे फटाके घेवून द्यायचे हा सरळ हिशोब मी केला होता. पण तिने घरी आणे पर्यंत काही म्हटले नाही. त्यामुळे कपडे बदलून मी छान झोप काढली. उठल्यावर संकट आले तर माझी तयारी होतीच ! उठल्यावर बराच वेळ TV पहात आमच्या गप्पा झाल्या. बाहेर इतर मुलांचे फटाके उडवणे सुरु झाले, मी वाटच बघत होतो. बराच वेळ झाल्यावर मी मुलीला विचारले तुझी तब्येत बरी आहे ना ? ती हो म्हणाली ! परत थोड्या वेळाने मी दोन तीनदा हाच प्रश्न विचारला. तिनेही शांतपणे माझ्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. तिला कळेना बाबांना काय झाले, त्यामुळे रात्री जेवताना तिने डाव साधला व मलाच उलट प्रश्न केला, "बाबा तुमची तब्येत बरी आहेना ?" म्हटले का ? तर म्हणे तुम्ही शाळेतन आल्यापासुन मला हाच प्रश्न विचारत आहात ना ! आता मी विचारला तर काय झाले ?
आज सकाळी मीच तिला म्हटले चल आपण थोडे फटाके आणुया. आणि तिचे उत्तर ऎकून  मला आश्चर्याचा धकाच बसला, "नाही आणायचे" मी म्हटले का ? माझ्यावर काही राग आहे का ? तर म्हणे यावर्षीपासुन फटाके नाही उडवायचे कारण त्यामुळे आवाजाचे व हवेचे प्रदुषण होते, त्यामुळे फटाके बंद.
खरच, नविन पिढीला फक्त नावेच ठवणार्‍या माझ्या सारख्याला धक्का नाहीतर काय बसणार ? धक्क्यातुन सावरल्यावर मात्र जाणीव झाली, माझी मुलगी आता मोठी झाली आहे व समंजस पण ! आजपर्यंत मी शिकवत होतो आता मात्र मला शिकवायला माझीच मुलगी तयार झाली आहे. त्यामुळे आमची ही दिवाळी फटाक्यांशिवाय होणार !

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०

मोह !

परवा चतुर्थीला टिटवाळ्याला गेलो होतो. बरेच दिवसात जायचे होते. अचानक जोड्याने जायचा योग आला !  दर्शनाला तोबा गर्दी आणि मोठ्ठी रांग. गणपतीच्या कृपेने पायाने त्रास अजिबात दिला नाही. संपूर्ण रांगेने जात त्या चक्रव्युहातुन बाहेर पडायला एक तास लागला. गर्दीतही दर्शन छान झाल्याचा आनंद झाला.
मंदिरात जाताना गर्दीच्या काळजीने सरळ लोकलमधुन उतरुन बाहेर पडलो, कुठेही न पहाता थेट दर्शनाच्या रांगेत लागलो. दर्शन घेतल्यावर मात्र परत यायची घाई नसल्याने डोळे उघडे ठेवून निघालो आणि टिटवाळा स्टेशन अगोदर "अनंत हलवाई"चे दूकान दिसले. काय वर्णावा तो आनंद. खरतर माझ्या पोटाच्या वाढलेल्या घेराला तेच जबाबदार आहेत. चांगले खायची सवय या अनंत हलवाईच्या कल्याणच्या दुकानानेच मला लावली !
मागच्या महिन्यात पायाला झालेल्या इजेने, थोडे खाण्यावर ताबा ठेवा हा डॉक्टरचा सल्ला महिनाभर इमाने इतबारे पाळतोय मात्र परवा "अनंत हलवाई" हा दूकानावरचा बोर्ड बघुन, डॉक्टरच्या सल्ल्याकडे थोडे दूर्लक्ष केले. बरेच दिवसांनी त्यांच्या कडचे काही खायला मिळणार होतेना ! अनंत हलवाईंचे श्रीखंड, हलवा, पेठा, जिलेबी, ढोकळा, पेढा असे किती तरी पदार्थ आहेत ज्यांना मी कल्याण सोडल्या पासुन खरोखरच मुकलोय ! तरिही कोणत्याही कामासाठी कल्याणला गेलोतर माझी अनंत हलवाईला भेट असतेच. चांगले पंधरा दिवस पुरतील इतका साठा घेऊन येतो व त्यानंतर दोन महीने घरी बोलणे खातो !
अनंत हलवाई कडील पदार्थांसोबतच मला जीभेवरचा ताबा सोडायला लावणारा पदार्थ म्हणजे कचोरी. कचोरी म्हणताच चांगली फुगलेली कचोरी डोळ्यापुढे येते, त्यात छान चटणी टाकून थोडी शेव भरुन खाणे एक छान पद्धतशीर कार्यक्रम असतो. पण नागपुरला जाताना येताना शेगावला गाडी थांबताच शर्माजींची स्टेशनवर मिळणारी कचोरी मी कधिच चुकवत नाही.
शर्माजींनी आपली कचोरी ठाण्यातच उपलब्ध करुन दिल्याने माझी बर्‍यापैकी सोय झाली आहे. त्यांचे दुकान गावदेवी मैदाना जवळच आहे. स्टेशनपासुन अगदी हाकेच्या अंतरावर !
संध्याकाळी फिरायला फार लांब जायचे नसेल तर राम मारुती रोडवर जायला मला आवडते. या रस्त्याच्या एका टोकाला संत गजानन महाराजांचे मंदिर आहे तर दुसर्‍या टोकाला समर्थ भांडार, समर्थ भांडारा जवळच पोटाची घेरी वाढवायला एक उत्तम ठिकाण आहे "राजमाता", येथील वडापाव वा समोसा मला आवडतो पण मला त्यापेक्षा जास्त आवडते त्या जवळच असलेले राजमाताचेच मसाला कोकम सोडा. मला याचा मोह आवरतच नाही.
पुढच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे घरचे पदार्थ असतीलच, डॉक्टरांचा सल्ला डावलता येणार नाही पण घरच्या पदार्थांना न्याय तर द्यायलाच हवा ना !