अनंत हलवाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनंत हलवाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०

मोह !

परवा चतुर्थीला टिटवाळ्याला गेलो होतो. बरेच दिवसात जायचे होते. अचानक जोड्याने जायचा योग आला !  दर्शनाला तोबा गर्दी आणि मोठ्ठी रांग. गणपतीच्या कृपेने पायाने त्रास अजिबात दिला नाही. संपूर्ण रांगेने जात त्या चक्रव्युहातुन बाहेर पडायला एक तास लागला. गर्दीतही दर्शन छान झाल्याचा आनंद झाला.
मंदिरात जाताना गर्दीच्या काळजीने सरळ लोकलमधुन उतरुन बाहेर पडलो, कुठेही न पहाता थेट दर्शनाच्या रांगेत लागलो. दर्शन घेतल्यावर मात्र परत यायची घाई नसल्याने डोळे उघडे ठेवून निघालो आणि टिटवाळा स्टेशन अगोदर "अनंत हलवाई"चे दूकान दिसले. काय वर्णावा तो आनंद. खरतर माझ्या पोटाच्या वाढलेल्या घेराला तेच जबाबदार आहेत. चांगले खायची सवय या अनंत हलवाईच्या कल्याणच्या दुकानानेच मला लावली !
मागच्या महिन्यात पायाला झालेल्या इजेने, थोडे खाण्यावर ताबा ठेवा हा डॉक्टरचा सल्ला महिनाभर इमाने इतबारे पाळतोय मात्र परवा "अनंत हलवाई" हा दूकानावरचा बोर्ड बघुन, डॉक्टरच्या सल्ल्याकडे थोडे दूर्लक्ष केले. बरेच दिवसांनी त्यांच्या कडचे काही खायला मिळणार होतेना ! अनंत हलवाईंचे श्रीखंड, हलवा, पेठा, जिलेबी, ढोकळा, पेढा असे किती तरी पदार्थ आहेत ज्यांना मी कल्याण सोडल्या पासुन खरोखरच मुकलोय ! तरिही कोणत्याही कामासाठी कल्याणला गेलोतर माझी अनंत हलवाईला भेट असतेच. चांगले पंधरा दिवस पुरतील इतका साठा घेऊन येतो व त्यानंतर दोन महीने घरी बोलणे खातो !
अनंत हलवाई कडील पदार्थांसोबतच मला जीभेवरचा ताबा सोडायला लावणारा पदार्थ म्हणजे कचोरी. कचोरी म्हणताच चांगली फुगलेली कचोरी डोळ्यापुढे येते, त्यात छान चटणी टाकून थोडी शेव भरुन खाणे एक छान पद्धतशीर कार्यक्रम असतो. पण नागपुरला जाताना येताना शेगावला गाडी थांबताच शर्माजींची स्टेशनवर मिळणारी कचोरी मी कधिच चुकवत नाही.
शर्माजींनी आपली कचोरी ठाण्यातच उपलब्ध करुन दिल्याने माझी बर्‍यापैकी सोय झाली आहे. त्यांचे दुकान गावदेवी मैदाना जवळच आहे. स्टेशनपासुन अगदी हाकेच्या अंतरावर !
संध्याकाळी फिरायला फार लांब जायचे नसेल तर राम मारुती रोडवर जायला मला आवडते. या रस्त्याच्या एका टोकाला संत गजानन महाराजांचे मंदिर आहे तर दुसर्‍या टोकाला समर्थ भांडार, समर्थ भांडारा जवळच पोटाची घेरी वाढवायला एक उत्तम ठिकाण आहे "राजमाता", येथील वडापाव वा समोसा मला आवडतो पण मला त्यापेक्षा जास्त आवडते त्या जवळच असलेले राजमाताचेच मसाला कोकम सोडा. मला याचा मोह आवरतच नाही.
पुढच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे घरचे पदार्थ असतीलच, डॉक्टरांचा सल्ला डावलता येणार नाही पण घरच्या पदार्थांना न्याय तर द्यायलाच हवा ना !