शाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - ३

यापुर्वीचे लेख शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - १

                       शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - २

        इयत्ता आठवी पासुन शासनाने सर्व प्रकारच्या शालेय (जसे महाराष्ट्र बोर्ड, CBSE व ICSE)  विद्यार्थ्याची माहिती उदाहरणार्थ नाव, जन्मतारीख, लिंग, दरवर्षी वार्षिक परिक्षेतील गुण,  पत्रव्यवहाराचा पत्ता, कायमचा पत्ता,  वडिलांचे नोकरीचे ठिकाण, कुठे नोकरी करतात त्या कंपनीचे नाव वा शक्य झाल्यास अधिक माहिती गोळा करावी. हि सर्व माहिती शाळेनेच शासनाच्या सर्व्हरवर अपलोड करावी. शासनाने हि माहिती अपलोड करण्यास तसेच बदलण्यास सर्व शाळेच्या व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना व प्राचार्यांना अधिकार द्यावेत. हे अधिकार मुख्याध्यापकांना व प्राचार्यांनाच असल्याने त्यात चुका वा चुकीची माहिती देण्याचा कल कमी होईल व झेरॉक्सचा होणारा खर्च पण कमी करणे शक्य आहे.
         दहावीच्या परिक्षेनंतर लगेचच मुलांनी आपल्या शाळेत जाऊन आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमाला जायचे आहे याची माहिती शाळेत द्यायची. म्हणजे शालांत परिक्षे नंतर त्या माहितीच्या आधारे शासनाने विद्यार्थ्याला त्याच्या घराजवळचे महाविद्यालय द्यावे. यात प्रत्येक विद्यार्थ्याला तीन पर्याय देण्यात यावेत. यापैकिच्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे त्याला बंधनकारक असावे. अशाप्रकारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया कमितकमी वेळात पूर्ण करणे शक्य आहे व अकरावीचे वर्गही जून किंवा जुलै महिन्यात सुरु होऊ शकतात.
            अकरावी सारखेच पदवी महाविद्यालयांचे प्रवेशही याप्रकारे राबवता येतील.
          यादरम्यान परराज्यातुन कोणी विद्यार्थी आल्यास त्याला त्या त्या वेळच्या शाळेत किंवा महाविद्यालयात सामावून घेताना तेथील प्राचार्य त्याची माहिती अपलोड करू शकतात.
          याच माहितीचा उपयोग नोकरीसाठी अर्ज करताना केला जाऊ शकतो. अर्ज करताना अर्जदाराला आपल्या गुणपत्रिकेची नक्कल न जोडता आपला या सर्व्हर वरचा क्रमांक द्यावा लागेल ज्या कंपनीला ही माहिती हवी आहे त्या कंपनीने शासनाला या माहितीचा वापर करण्यासाठी काही ठराविक शुल्क द्यावे. याप्रकारे शासनाला ही सर्व माहिती साठवून ठेवण्यासाठी होणारा खर्चही कमी करता येईल.
            या पद्धतीचे बरेच फायदे आहेत.
१ विद्यार्थ्याला अकरावी व महाविद्यालयीन प्रवेश घेताना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
२. सर्व माहिती शासनाने गोळा केलेली असल्याने त्याला वेगवेगळ्या दाखल्यांची गरज लागणार नाही.
३. सर्व माहिती प्राचार्यांनी तपासलेली असल्याने वेगळ्या तपासणीची गरज भासणार नाही.
४. फोटोकॉपी काढण्यास होणारा खर्च कमी करता येईल.
५. विद्यार्थ्याला घरबसल्या सर्व व्यवहार करता येतील.
६. जवळचे महाविद्यालय मिळाल्याने होणारा प्रवासाचा त्रास कमी होईल व रेल्वे तसेच बस मधिल विद्यार्थ्यांची गर्दी कमी होईल व त्यांचा त्रासही.

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - १

मार्च महिन्यात दहावीची परिक्षा संपल्यावर विद्यार्थी निकाल व त्यानंतर हवा तिथे प्रवेश मिळेल कि नाही या मानसिक दडपणाखाली असतात. जवळपास सहा महिने रिकामे राहून मानसिक दडपणाखाली रहाण्याच हे वय नाही. यावर उपाय काढायला शासन स्तरावर तसेच शैक्षणीक क्षेत्रातील अनुभवी जाणकार प्रयत्नात असावेत त्यामुळेच यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बरिच सुरळीत पार पडली. तरिही या प्रक्रियेला लागणारा अकून कालावधी बघता यावर यापेक्षा चांगला तोडगा निघायला हवा असे वाटते.
अभियांत्रिकी प्रवेश ज्याप्रकारे केंद्रिभूत पद्धतीने केले जातात तसे अकरावी साठी अवलंबण्यात आले आहेत. पण अजुनही ते बरेच वेळखाऊ वाटतात तसेच त्यानंतर बारावी नंतर परत याच पद्धतीचा वापर करुन अभियांत्रीकी प्रवेश देण्यात येतात. या दोन्ही पद्धतींचा एकूण विचार केल्यावर असे वाटते कि ही पद्धत अधिक सुकर करण्यात यावी.
मागील ५ - ६ वर्षे या पद्धतीचा अभ्यास केल्यावर असे वाटते कि यात बरीच सुधारण करणे शक्य आहे. ही नविन पद्धत तयार करताना एक विचार असा आला कि विद्यार्थी जेथे रहातो त्या ठिकाणा जवळच्याच शाळा - महाविद्यालयात त्याला प्रवेश देण्यात आला तर वाहतुकीची समस्या पण काही अंशी सुटेल. कोणत्याही विद्यार्थ्याला गच्च भरलेल्या लोकल किंवा बसने प्रवास करावा लागू नये ह्याचा विचार पण करण्यात आला.
या समस्येवर सुचलेला उपाय दर आठवड्याला एक भाग या तर्‍हेने पोस्ट करण्यात येईल. सर्वांना विनंती करतो कि आपल्या सुचना अवश्य कळवाव्यात.

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

बदलते समाजजीवन - २ शाळा.

समाजात घराबाहेर पडल्यावर पहिला संबंध येतो तो शाळेचा. शाळेतच मुले अभ्यास, खेळ, सामान्य ज्ञान तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी लागणारे सर्व शिकतात. शाळेतील दिवस कोणत्याही माणसाला न विसरता येणारे असतात. एखाद्या लहान मुलासमोर त्याच्या शाळेला नावे ठेवून बघा, त्याची प्रतिक्रिया किती तीव्र असते, त्याच्या प्रतिक्रियेतच त्याचे त्याच्या शाळेबद्दलचे भावविश्व दिसते. त्यामुळेच शाळेला नावे ठेवलेली मुले सहन करु शकत नाहीत.
पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे पुर्वी एका वर्गात ३५ ते ४० मुले असायची तर आज ही संख्या बरीच वाढली आहे, काही ठिकाणी ६० ते ७० मुलेही वर्गात आढळतात.
३५ ते ४० मुले असलेला वर्ग सांभाळणे, वर्गाला शिकवणे व हे करत असताना शिक्षक त्या मुलांच्या जीवनात एक महत्वाचा भाग होऊन जायचा.  त्यावेळेस शिक्षक हा शिक्षकच असायचा. त्यामुळेच त्याला तसे करणे सोपे जायचे.
आज ६० ते ७० विद्यार्थ्यांच्या गराड्यात शिक्षक आपल्या कामाला न्याय देवू शकत नाही. त्यात त्याला जर निवडणुका ते जनगणना असे कार्यक्रम दिलेत तर, शिक्षकाने आपला अभ्यास कधि करायचा ? केलेल्या अभ्यासावर चिंतन कधि करायचे ?
शिक्षक व्यस्त व त्रस्त आणि विद्यार्थी मोकाट.

शिक्षकाला असली कामे देण्याने तो आपल्या दैनंदिन कामात लक्ष घालु शकत नाही. त्यामुळे वर्गाकडे होणार्‍या दुर्लक्षाचा गैरफायदा मुले उचलतात. अभ्यास न करणे व शालेय विद्यार्थ्याने करु नये असे बरेच उपद्व्याप शाळेतील मुले करताना दिसतात जसे वर्गातील मुलींना छेडणे, असभ्य शब्दांचा वापर, पालक तसेच शिक्षकांबद्दल अर्वाच्य शब्दांचा वापर इ. त्यामुळेच तीसर्‍या वर्गातला मुलगा आपल्या वर्गमित्रावर कात्रीने वार करु शकतो.

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

बदलते समाजजीवन - १ :

घरी दोन तीन भाऊ बहिण, शेजारीच काका काकू, चुलत भाऊ बहिण, पलिकडे जुने वडिलांचे स्नेही ज्यांना काकाच म्हटले जायचे, शाळेत वर्गात ३५/४० मुले/मुली शिक्षकांना सर्वांची नावेच नव्हेत तर घरी कोण आहेत याची माहिती असायची, अशा वातावरणात मुलांकडे / मुलीकडे लक्ष देणारे बरेच असायचे. त्यामुळे जरा काही वाकड वागल तर घरी संध्याकाळी पाठिवर फटाके फुटायचे, शिमगा व दिवाळी एकाच दिवशी !
जरा मोठे झाल्यावर न कळणारी पण शासनाच्या कृपेने सर्वत्र झळकणारी जाहिरात बघायला मिळायची, "छोटे कुटूंब सुखी कुटूंब". पत्र्यावर छापलेली व भिंतीवर गेरुने रंगवलेली हि जाहिरात त्यावेळी हमखास दिसायची.
छान होते ते दिवस. फारशा सोयी नव्हत्या पण सर्वच सुखी दिसायचे. सणासुदीला घरी जेवायला कुणीतरी असायचेच. मजा यायची त्या पंगती बघताना. कधितरी त्या पंगतीत वाढायला मजा यायची. पुढे पुढे हे सर्व कमी झाले. सख्खेच लांबच्या गावाला नोकरिला. गावात फक्त आई वडिल आणि दोन बछडे, हाच संसार, हेच विश्व. कालांतराने आई पण घर खायला ऊठते म्हणुन किंवा शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणुन नोकरिला.
आईच्या हातचे फक्त सणाला, इतर वेळेस शेजारच्या वाण्याकडून मॅगी आणले कि दोन मिनीटात तयार, घरी कंटाळा आल्यावर मित्रांसोबत खेळायला मजा यायची. त्यानंतर एका मोठ्ठ्या राक्षसाने घराघरात प्रवेश केला पण हा राक्षस संध्याकाळी काहिच वेळ दिसायचा त्यामुळे सर्वांचे लक्ष घड्याळाकडे असायचे. हा TV  नामक राक्षस काही वेळ खाऊन बंद व्हायचा, चांगली करमणुक करायचा. काही वर्षांनी या राक्षसाने आपली पकड अधिकच घट्ट केली. जेमतेम चार तास खाणारा हा राक्षस चोवीस तास घरातच रहायला लागला. तेथेच समाजजीवनाच्या बदलाची सुरुवात झाली. मुलांचे घराबाहेर खेळणे कमी झाले व TV समोरचा वेळ वाढायला लागला. समोर  कुरकूरे व TV, येथेच आयुष्याच्या कुकूरीने पण सुरुवात केली. चोवीस तास TV वर काय दाखवायचे ? हा एक मोठ्ठा पश्न निर्मात्यांपुढे. ते तरी काय करणार. हा प्रश्न सोडवायला त्यांनी पण अतिशय आक्रमकतेने आपले कार्यक्रम राबवणे सुरु केले. पोट भरायला प्रतिस्पर्ध्या पुढे रहायला हवेच यातुनच या TV चॅनल्सचा आक्रस्ताळेपणा वाढायला लागला. बातमी कशा प्रकारे कव्हर करायची याला धरबंध राहिला नाही व मालिकां मध्ये तोचतो पणा जाणवायला लागला. रियालिटी शो ने तर सर्वच बंधने झुगारलेली दिसतात.