महाविद्यालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाविद्यालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - ३

यापुर्वीचे लेख शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - १

                       शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - २

        इयत्ता आठवी पासुन शासनाने सर्व प्रकारच्या शालेय (जसे महाराष्ट्र बोर्ड, CBSE व ICSE)  विद्यार्थ्याची माहिती उदाहरणार्थ नाव, जन्मतारीख, लिंग, दरवर्षी वार्षिक परिक्षेतील गुण,  पत्रव्यवहाराचा पत्ता, कायमचा पत्ता,  वडिलांचे नोकरीचे ठिकाण, कुठे नोकरी करतात त्या कंपनीचे नाव वा शक्य झाल्यास अधिक माहिती गोळा करावी. हि सर्व माहिती शाळेनेच शासनाच्या सर्व्हरवर अपलोड करावी. शासनाने हि माहिती अपलोड करण्यास तसेच बदलण्यास सर्व शाळेच्या व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना व प्राचार्यांना अधिकार द्यावेत. हे अधिकार मुख्याध्यापकांना व प्राचार्यांनाच असल्याने त्यात चुका वा चुकीची माहिती देण्याचा कल कमी होईल व झेरॉक्सचा होणारा खर्च पण कमी करणे शक्य आहे.
         दहावीच्या परिक्षेनंतर लगेचच मुलांनी आपल्या शाळेत जाऊन आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमाला जायचे आहे याची माहिती शाळेत द्यायची. म्हणजे शालांत परिक्षे नंतर त्या माहितीच्या आधारे शासनाने विद्यार्थ्याला त्याच्या घराजवळचे महाविद्यालय द्यावे. यात प्रत्येक विद्यार्थ्याला तीन पर्याय देण्यात यावेत. यापैकिच्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे त्याला बंधनकारक असावे. अशाप्रकारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया कमितकमी वेळात पूर्ण करणे शक्य आहे व अकरावीचे वर्गही जून किंवा जुलै महिन्यात सुरु होऊ शकतात.
            अकरावी सारखेच पदवी महाविद्यालयांचे प्रवेशही याप्रकारे राबवता येतील.
          यादरम्यान परराज्यातुन कोणी विद्यार्थी आल्यास त्याला त्या त्या वेळच्या शाळेत किंवा महाविद्यालयात सामावून घेताना तेथील प्राचार्य त्याची माहिती अपलोड करू शकतात.
          याच माहितीचा उपयोग नोकरीसाठी अर्ज करताना केला जाऊ शकतो. अर्ज करताना अर्जदाराला आपल्या गुणपत्रिकेची नक्कल न जोडता आपला या सर्व्हर वरचा क्रमांक द्यावा लागेल ज्या कंपनीला ही माहिती हवी आहे त्या कंपनीने शासनाला या माहितीचा वापर करण्यासाठी काही ठराविक शुल्क द्यावे. याप्रकारे शासनाला ही सर्व माहिती साठवून ठेवण्यासाठी होणारा खर्चही कमी करता येईल.
            या पद्धतीचे बरेच फायदे आहेत.
१ विद्यार्थ्याला अकरावी व महाविद्यालयीन प्रवेश घेताना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
२. सर्व माहिती शासनाने गोळा केलेली असल्याने त्याला वेगवेगळ्या दाखल्यांची गरज लागणार नाही.
३. सर्व माहिती प्राचार्यांनी तपासलेली असल्याने वेगळ्या तपासणीची गरज भासणार नाही.
४. फोटोकॉपी काढण्यास होणारा खर्च कमी करता येईल.
५. विद्यार्थ्याला घरबसल्या सर्व व्यवहार करता येतील.
६. जवळचे महाविद्यालय मिळाल्याने होणारा प्रवासाचा त्रास कमी होईल व रेल्वे तसेच बस मधिल विद्यार्थ्यांची गर्दी कमी होईल व त्यांचा त्रासही.

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - २

महाविद्यालयीन प्रवेशाची समस्या सोडवण्यासाठी मुख्यत: काही बाबींचा विचार केल्यावर खालील समस्या प्रकर्शाने जाणवल्या.
१. प्रवेश अर्ज विकत घेणे.
२. अर्ज भरल्यावर तो संबंधित महाविद्यालयात जमा करणे.
३. अर्ज जमा केल्यावर महाविद्यालयात जाऊन गुणवत्ता यादी बघणे.
४. आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळे पर्यंत प्रवेश घेणे व रद्द करणे यात बराच पैसा वाया जातो.
     वरिल चारही बाबतीत विद्यार्थ्याला व सोबत पालकांना बराच वेळ रांगेत उभे रहावे लागते जे सर्वांनाच गैरसोयीचे आहे. कारण यात बराच वेळ उगाचच वाया जातो व एखाद्या विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त महाविद्यालयात अर्ज करायचा असेल तर त्याला तितक्याच जास्त महाविद्यालयात रांगेत उभे रहावे लागते.
     प्रत्येक अर्जासोबत सत्य प्रतिलीपी जोडावी लागते ज्यामुळे त्याला झेरॉक्सचा नाहक भुर्दंड पडतो.
    प्रवेश मिळेपर्यंत विद्यार्थ्याचा जीव टांगणी वर असतो ज्यामुळे त्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
   या संगणकाच्या युगात शासनाने आठव्या वर्गापासुन जर शाळानिहाय विद्यार्थ्यांची माहिती गोळा करुन ठेवली व महाविद्यालयीन प्रवेशा वेळी संबंधित महाविद्यालयांना ती माहिती पुरवण्यात आली तर कोणताही अर्ज न भरता सर्व महाविद्यालयांना प्रवेश देणे सोयीचे होईल. या पद्धतीत कागदाचा होणारा वापरही कमी होईल व ते पर्यावरणाच्या पण हिताचे असेल.
(शासन कशाप्रकारे ही माहिती गोळा करु शकते व त्याचा वापर कसा करता येईल हे पुढील लेखात.)

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - १

मार्च महिन्यात दहावीची परिक्षा संपल्यावर विद्यार्थी निकाल व त्यानंतर हवा तिथे प्रवेश मिळेल कि नाही या मानसिक दडपणाखाली असतात. जवळपास सहा महिने रिकामे राहून मानसिक दडपणाखाली रहाण्याच हे वय नाही. यावर उपाय काढायला शासन स्तरावर तसेच शैक्षणीक क्षेत्रातील अनुभवी जाणकार प्रयत्नात असावेत त्यामुळेच यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बरिच सुरळीत पार पडली. तरिही या प्रक्रियेला लागणारा अकून कालावधी बघता यावर यापेक्षा चांगला तोडगा निघायला हवा असे वाटते.
अभियांत्रिकी प्रवेश ज्याप्रकारे केंद्रिभूत पद्धतीने केले जातात तसे अकरावी साठी अवलंबण्यात आले आहेत. पण अजुनही ते बरेच वेळखाऊ वाटतात तसेच त्यानंतर बारावी नंतर परत याच पद्धतीचा वापर करुन अभियांत्रीकी प्रवेश देण्यात येतात. या दोन्ही पद्धतींचा एकूण विचार केल्यावर असे वाटते कि ही पद्धत अधिक सुकर करण्यात यावी.
मागील ५ - ६ वर्षे या पद्धतीचा अभ्यास केल्यावर असे वाटते कि यात बरीच सुधारण करणे शक्य आहे. ही नविन पद्धत तयार करताना एक विचार असा आला कि विद्यार्थी जेथे रहातो त्या ठिकाणा जवळच्याच शाळा - महाविद्यालयात त्याला प्रवेश देण्यात आला तर वाहतुकीची समस्या पण काही अंशी सुटेल. कोणत्याही विद्यार्थ्याला गच्च भरलेल्या लोकल किंवा बसने प्रवास करावा लागू नये ह्याचा विचार पण करण्यात आला.
या समस्येवर सुचलेला उपाय दर आठवड्याला एक भाग या तर्‍हेने पोस्ट करण्यात येईल. सर्वांना विनंती करतो कि आपल्या सुचना अवश्य कळवाव्यात.