माझे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ सप्टेंबर, २०१०

शिक्षक दिन.

आज शिक्षक दिन. आपल्याला शिकवण्यात जे शिक्षक आवडले त्या सर्वांच स्मरण करणे व आपल्या जीवनाच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा उचलणार्‍या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान देणारा नसावा असे म्हटले जाते कारण पुस्तकी ज्ञान कधिही मिळवता येते पण व्यावहारिक ज्ञान योग्य वेळेसच मिळायला हवे. माणसाच्या जीवनात व्यावहारीक ज्ञानच लौकिक दृष्ट्या उपयोगी आहे.
आजच्या या शिक्षक दिनी मला माझ्या शैक्षणीक आयुष्यात भेटलेल्या शिक्षकांचे स्मरण करणे माझे कर्तव्य समजतो. माझ्या या शिक्षकां पैकी काही शिक्षक या जगात नाहीत त्यांना माझी श्रद्धांजली वाहतो.
सर्वप्रथम मला माझ्या प्राथमिक शाळेत शिकवणारे श्री. बंसोड यांना मी कधिच विसरु शकत नाही. वर्गात शिकवताना वर्गातली शिस्त व खेळत खेळत शिकवायची त्यांची शैली मला फार आवडायची. खेळतानाच त्यांनी आमच्या कडून ज्या तर्‍हेने पाढे पाठ करवून घेतले होते ती पद्धत कायम स्मरणात आहे. शाळेत शिकवतानाच आपण समाजाच काही देण लागतो या जाणिवेने गुरुजी समाजात जमेल तसे कामही करायचे. या कामाची पावती त्यांना शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन दिली.

आमच्या शाळेतले मुख्याध्यापक श्री. पांडे हे कडक शिस्तीचे होते. त्यांचे लक्ष कायम सर्व विद्यार्थ्यांवर असायचे. कधितरी सर व्यावहारीक गोष्टीपण सांगायचे ज्या मुळे व्यवहारात एखादी चुक झाल्यास आजही सरांची आठवण येते.

माध्यमीक शाळेत गेल्यावर आम्ही थोडे मोठे झालो होतो. अभ्यासाशिवाय हुंदडण्यात व पतंग उडवण्यात भारी लक्ष, अशा वेळेस अभ्यासात गोडवा निर्माण करण्याच मोठ्ठ काम आमच्या अंजीकर सरांनी केल. गणितात व विज्ञानात आवड वाढावी यासाठी आजही अंजीकर सर कायम प्रयोग करायचे त्यामुळे माझे गणित शाळेत असताना इतरांच्या तुलनेत फारच चांगले झाले होते. अंजीकर सरांबद्दल त्यावेळेस भिती वाटायची कारण आमचे गणित चुकले तर त्यांना फार वाईट वाटायचे. त्यांना वाईट वाटू नये हे बघण्याची जबाबदारी आमची होती !

आठवी नववी व दहावी या वर्गात असताना मनापासुन शिकवणारे शिक्षक भेटले ते सर्वच माझ्या चांगले लक्षात आहेत त्यामुळे कोणा एकाच नाव घॆण हे इतरांवर अन्याय करण्या सारख होईल असे वाटते. त्याएळेसचे आमचे स्वामी सर आज आमच्या शाळेत मुख्याध्यापक झाले आहेत. वीस वर्षांनी मागच्या वर्षी त्यांना भेटण्यात खुपच आनंद मिळाला.

अकोल्याला नोकरि लागल्यावर आमच्या कॉलेजचे प्राचार्य श्री. गाडगीळ हे मला व्यवहार शिकवणारे अजुन एक शिक्षक. माणुसकी काय असते हे गाडगीळ सरांकडुनच शिकाव. सुंदर गोष्टींच खजिनाच त्यांच्याकडॆ होता.

या सर्वांची आठवण कायमच येत असते. आज शिक्षक दिनाला मी या सर्वांना कसे विसरणार ?