गुरुवार, २ सप्टेंबर, २०१०

स्वदेशी.

            भारतात बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तुंमधे स्वदेशी कारखानदारांनी निर्मीलेली व परदेशी कारखानदारांनी / कंपन्यांनी निर्मीलेली अशी सरळ सरळ विभागणी करता येईल. बहुतेक ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु या परदेशी कंपन्यांनी निर्मीलेल्या आढळतात त्यात सोनी, नोकिया, सॅमसंग या परदेशी कंपन्यांनी भारतीय बाजारात चांगलेच बस्तान मांडले आहे. कुठल्या प्रकारची ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला एका विशिष्ठ कंपनीचे नाव समोर येते. उदाहरणार्थ मोबाईल फोन म्हटला कि नोकियाची आठवण आल्या शिवाय मोबाईलचा विचार करणे अशक्य आहे. तर दूरदर्शन संच घ्यायचा असल्यास सोनीचा संच आठवणारच.
          या परदेशी कंपन्यांची एक कौतुक करण्यासाराखी गोष्ट म्हणजे ते आपल्या ग्राहकांप्रती कमालिचे जागृत असतात. का नसणार त्यांना आपले दुकान वर्षानुवर्षे चालवायचे आहे ना ! तर हे दुकान चालत रहावे म्हणुन ते कायम नवनविन कल्पना आपल्या उत्पादनात जोडत जातात व आपले उत्पादन कायम ग्राहकांना मोहवत ठेवेल याची काळजी घेतात. ग्राहकाला पण वाटते आपले जुने मॉडेल जुने झाले व नविन घ्यायला हवे.  या कंपन्यांचा ग्राहकच हे दुकान कायम चालत राहिल याची काळजी घेतो.  एका ग्राहकाच्या चुकीमुळे मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यावर म्हणुनच नोकियाने आपल्या सर्व तत्सम बॅटर्‍या बदलून देण्याची तयारी दाखवली. हे सर्व करताना पानपान भराच्या जाहिराती दिल्याचे आपल्याला आठवतच असेल. त्यांनी त्यांच्या जाहिरातीत आपले ग्राहक तुटणार नाहीत याची व्यवस्थीत काळजी घेतली. चुक ग्राहकाची आहे हे माहित असुनही त्यांनी आपले नाव खराब होवू नये व ग्राहक टिकावा याची संपूर्ण दक्षता घेतलीच.
          या विरुद्ध परिस्थीती आपल्या भारतीय उत्पादनांची आहे हे सांगताना खेद होतो. ग्राहक हा या स्वदेशी कंपन्याचे उत्पादन विकत घेण्या पर्यंत राजा असतो, त्यानंतर मात्र त्याला एखाद्या भिकार्‍या सारखे या कंपन्यांना फोन किंवा इतर मार्गाने भिक मागावी लागते. या कंपन्यांना आपल्या उत्पादनातल्या तृटी दुरुस्त करुन देण्यात व ग्राहक टिकावा असे वाटतच नाही. उदाहरणार्थ: आपण Videocon या कंपनीचे कोणतेही उत्पादन विकत घेवून बघा, ते चांगले चालले तर आपले नशिब अन्यथा आपल्याला यांव्या दारात भिक मागत फिरावे लागेल.
          स्वदेशी जागरण मंचाच्या प्रेरणेने आपले बरेच ग्राहक स्वदेशी उत्पादन विकत घ्यायला लागले. या मागच अर्थशास्त्र पटल्यामुळेच त्यांनी भारतीय उत्पादनेच विकत घ्यायची असे ठरवले. खरतर जागरण मंचामुळे आपल्या कंपन्यांना एक चांगली संधी चालुन आली होती पण संधीचे सोने करण्या ऎवजी ग्राहकाच्या माथी निकृष्ट उत्पादने मारण्याचा व पैसे कमावण्याचाच व्यवसाय या कंपन्यांनी सुरु केल्याचे आढळेल.  या व्यवसाय पद्धतीमुळे बर्‍याच चांगल्या भारतीय उत्पादनांकडे ग्राहक पाठ फिरवू शकतो याची या कंपन्यांना जाणीव असल्याचे दिसत नाही.
           अशा या निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांच्या बाजारात काही चांगली उत्पादनेही आहेत व यांचा ग्राहक दिवसेंदिवस वाढत आहे हेही दखल घेण्यासारखे आहे. यात प्रामुख्याने विको वज्रदंती तसेच पितांबरी सारखी चांगली उत्पादने आहेत.  भारतातल्या मोठ्या कंपन्या जागतीक दर्जाची कामगीरी करित असतांना सामान्य ग्राहकाकडे भारतीय कंपन्या दुर्लक्ष करताहेत यात त्यांचेच नुकसान अधिक संभवते.

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

घाम !

     मी ठाणे स्टेशन जवळ घर मिळाल्यामुळे स्वत:ला फारच भाग्यवान समजतो. घरुन सक्काळी सक्काळी कॉलेजला जाताना रिक्षा वाल्याच्या मुजोरिचा सामना करावा लागत नाही कि महानगरपालिकेच्या कृपेने खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरुन जावे लागत नाही ! घराबाहेर निघताच लगेच फलाट क्रमांक एक वरुनच गाडी मिळते.
    पण काही कारणाने एक वरुन निघणारी गाडी चुकली तर ?
     तर मात्र त्याच नशिबाला दोष देण्याशिवाय व घामाघुम होण्याशिवाय माझ्या कडे पर्याय शिल्लक रहात नाही. कारण आपण सकाळच्या वेळेची ठाण्याला कोणत्याही पुलावरची गर्दी बघितली तरच माझे म्हणणे आपल्याला पटेल.
     गर्दीचा कोणताही विचार न करता रेल्वे प्रशासनाने ठाणॆ वाशी तसेच ठाणे पनवेल मार्ग खुला केलाय. त्यामुळे फलाट क्रमांक ३ व ४ ला एका वेळेस लोकल आल्यातर दोन्ही बाजुचे पुल गर्दीने तुडूंब भरुन जातात. फलाटा वरुन पुलावर चढणारे व पुलावरुन ३ व ४ वर उतरणारे प्रवासी अशा वेळेस कोणतीही शिस्त न पाळता पुढे जायचा प्रयत्न करित असतात. क्रमांक दोन वरुन फलाट क्रमांक तीनवर जायला या गर्दीमुळे जवळपास ३० मिनिटे वाया जातात. व आपल्या समोर ३ ते ४ लोकल सुटतात.  बरेचदा वाटते या परिस्थीतीत एखादा समाज कंटक भिती दाखवायला काहिजरी ओरडला तर पुलावरिल लोक सैरावैरा पळत सुटतील व होणार्‍या चेंगराचॆगरीत किमान ५०० लोक दगावतील. मागल्याच वर्षी फलाट क्रमांक ३ वर एक पाल अंगावर पडल्याने एक बाई जोरात किंचाळली होती व काय झाले हे लक्षात न घेता फलाट क्रमांक ३ व ४ वरुन लोकांनी सरळ रुळावर उड्या घेतल्याची घटना लोक विसरले नाहित. सुदैवाने मोठी प्राणहानी या वेळेस टळली होती.
      गर्दीच्या वेळेस दोन्ही पुलांवर रेल्वेला सुरक्षा रक्षक ठेवणे शक्य नाही कां ? कि रेल्वे प्रशासन एखादा अपघात घडावा याची वाट बघत आहे ?
  

सोमवार, १२ जुलै, २०१०

आठवण.

कुणाचे निधन झाल्यास घरातले, जवळचे नातेवाईक वा मित्रमंडळी त्या व्यक्तिचे गुण गात चार दिवस रडतात. त्यानंतर सर्वच आपल्या संसारात मग्न होतात ते नविन व्यक्तिचे निधना पर्यंत.....


काय असते या रडण्यामागचे कारण.
१. गेलेली व्यक्ति फारच चांगली होती.
२. त्या व्यक्तिचे आपल्यावर फार उपकार होते.
३. त्याच्या किंवा तिच्या शिवाय आपले जगणे अवघड होणार असते.

कि

४. ती व्यक्ति जीवंत असताना आपण त्या/तीच्यासोबत वाईट वागलो, तसे वागायला नको होते याची जाणीव झाल्यामुळे ?

रविवार, ११ जुलै, २०१०

मोबाईल.

मोबाईल माणसाच्या आरोग्यास अपायकारक आहे किंवा नाही हा विषय वादग्रस्त असु शकतो. पण मोबाईलचा वापर ज्या तर्‍हेने केला जातो त्याबद्दल वाद असु शकत नाही.
लहानपणी शाळेत शिकवतात, रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला बघून वाहन येत नाही याची खात्री करुन मग ओलांडावा. हा नियम मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडणार्‍या तरुण / तरुणींना लागू नाही कि काय असा प्रश्न मला बरेचदा पडतो.
मोबाईल वर बोलत रस्ता ओलांडणे किंवा वाहन चावताना मोबाईलवर बोलणे हे आपल्याच नव्हेतर इतरांच्याही जीवाला घातक होऊ शकते हे या तरुणांना कोण सांगणार ?
परवाचीच घटना मी ठाण्याला गोखले रोडवरुन मोटरसायकलने जात असतांना एक तरुण अचानक रस्त्यावर सरळ माझ्या दिशेने चालत आला. मी सावध असल्यामुळे बचावलो अन्यथा आम्ही दोघेही एखाद्या रुग्णालयात पोहोचलो असतो. किंवा बघुन वाहन चालवत नाही या कारणाने तेथील लोकांनी कदाचित मलाच झोडपले असते. हे झाल्यावरही त्या मुलाच्या चेहर्‍यावर जसे काहीच घडले नाही हे पाहून तर वाटले द्यावे याच्या कानाखाली.

रविवार, ४ जुलै, २०१०

माझाही प्रयत्न.

श्री. महेंद्र कुलकर्णींच काय वाटेल तेहेमंत आठल्ये, चंद्रशेखर यांच अक्षरधूळ , दिनेशच सर्वोत्तम मराठी विनोद व अनिकेतचा भूंगा वाचतांना वाटायच आपणही काही लिहाव. तसही कॉलेज मध्ये फळ्यावर लिहीण्या शिवाय कधि काही लिहून बघितल्याच आठवत नाही.
पण लिहीणार तरि काय ?
कालच महेंद्रच पोस्ट वाचतांना मात्र वाटल विषयाच बंधन न ठेवता लिहीत जायच. कुणाला आवडल तर ठिक अन्यथा आपल्याला लिहायची तर सवय होईल ! त्यासाठीच नाव निवडल आ सेतू हिमाचलम...
हा ब्लॉग तयार करण्यापूर्वी आणखी एक महत्वाच म्हणजे मराठी कसे टाईप करणार. यासाठी मदतीला आपलेच काही ब्लॉगर मित्र होतेच ना मदतीला ! त्यांचे पोस्ट वाचून बराहा डाऊनलोड केल थॊडी सवय होत पर्यंत लिखाण करुन बघितल.
बघा आपल्याला आवडल तर जरुर अभिप्राय द्या नावडल्यास तसे कळवा.